प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं….तुमचं आमचं सर्व सेम असतं. या ओळी आणि प्रेमाच्या प्रवाहात वाहत चाललेला कोणीही व्यक्ती एकमेकांचे हमराहीच असतात. पण, एखाद्या चित्रपटाप्रमाणे प्रेमाच्या या स्वप्नवत दुनियेत प्रवेश करण्यापूर्वी क्रश नावाचा टिझर आपल्याला पाहावाच लागतो. मुख्य म्हणजे हा टिझरच कधीकधी हृदयाच्या एका कोपऱ्यात कायमचाच सेव्ह होऊन जातो. असंच काहीसं घडलं अभिनेता कुशल बद्रिकेसोबत. मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वामध्ये विनोदाची परिभाषा बदलणाऱ्या काही विनोदवीरांमध्ये कुशलच्या नावाचा समावेश होतो. पण, आपल्या दिसण्यावरुन मनात काहीसा संकोचलेपणा बाळगणारा हा अभिनेता प्रेमात पडतानाही काहीसा काचरला होता हेच खरे. अशा या धम्माल अभिनेत्याच्या फर्स्ट क्रशची नेमकी कहाणी आहे तरी काय? हे जाणून घेण्याची इच्छा आहे… चला तर मग कुशलकडूनच जाणून घेऊया त्याच्या फर्स्ट क्रशची कहाणी….
खरं तर माझं जे क्रश होतं तीच माझी जीवनसंगिनी झाली. माझं एकाच मुलीवर जीवापाड प्रेम बसलं तिच्यासोबतच मी लग्न केलं. अजूनही मी तिच्यावरच प्रेम करतो आणि व्हेलेंटाइन डेसाठी मी तिला काय सरप्राइज देऊ शकतो हेच सर्च करतोय. बाकी माझं दुसरं कोणतचं लफडं नाही. लग्नाच्या गाठी वरून बांधून येतात यावर माझा लग्नानंतर विश्वास बसला. त्यावेळी मी अंबरनाथला एका कॉलेजमध्ये शिकत होतो. तेव्हा खुल्या एकपात्री अभिनय स्पर्धेत माझं जबरदस्तीने नाव टाकण्यात आलं होतं. तोपर्यंत मी ५०-६० एकपात्री स्पर्धांमध्ये भाग घेतलेला होता. पण माझ्या आयुष्यात काही वेगळं असं घडत नव्हतं. तिथे सिद्धार्थ जाधवनेही परफॉर्मन्स केला होता. तो संपूर्ण कार्यक्रम मी पाहिलेला. त्यात एक मुलगी होती जिने ‘ती फुलराणी’मधला एक पॅच सादर केलेला. माझ्या भावाला तेव्हा मी म्हटलं की ही कमाल आर्टिस्ट आहे. तिच मला काम मला मनापासून आवडलं होतं. त्यानंतर बक्षिस समारंभाचा कार्यक्रम जेव्हा सुरु झाला तेव्हा त्या मुलीला उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक मिळालं. आणि मला त्या संपूर्ण एकपात्री स्पर्धेचं पहिलं पारितोषिक मिळालं होतं. तिथून माझा प्रवास सुरु झाला. ही जवळपास २०-२२ वर्षांपूर्वीची गोष्ट होती. त्यानंतर बराच काळ लोटला आणि आम्ही एकांकिका स्पर्धा करायला सुरुवात केली. तेव्हा डोंबिवलीच्या एका ग्रुपने मला आमच्यासोबत काम करशील का असं विचारलं? त्यावर मी लगेच होकार दिला. तो काळचं असा होता की एकांकिकांमध्ये काम करणा-या नटांना तेव्हा काम मिळत होतं. त्यामुळे मी अगदीच आवडीने काम करेन असं म्हटलं. तिथे मला असं सांगण्यात आलं की, ही सुनैना आणि एकांकिकेत ती तुझी बायको असेल. तिच्याबरोबर काम करताना ती खूप छान काम करत असल्याचा अनुभव मला आला. पण, मी तिला कधी सांगितलं नाही. मात्र, आमचं चांगलं ट्युनिंग जमेल हे मला तेव्हा कळलं होतं. नंतर नंतर स्पर्धेचे प्रयोग होत गेले. एकांकिकेत तिला हमखास बक्षिस मिळायचं. त्यामुळे मी तिच्यावर इम्प्रेस होत गेलो. एकदा गडकरी रंगायतनला प्रयोग असताना मी एका विंगेत पडलो. धडक बसल्यामुळे माझे दात तेव्हा तुटले. माझा अपघात झाल्यामुळे तिला खूप काळजी वाटायला लागली. तिथे कुठेतरी मला वाटायला लागलं की, ‘चलो खाली धुआ नही, तो आग भी जल रही है यार..’ आणि मग आम्ही प्रेमात पडलो. पण, मी तिला कधीच विचारलं नाही. तिने मला विचारलं आणि मी तिला हो म्हटलं. त्यावेळी माझ्या मनात स्वतःविषयी संकोचलेपणा होता. एकतर मी चाळीत राहायचो. त्यात दिसायला मी इतका देखणा की आमिरला मागे पाडेन. पण, मी तिला भाग पाडलं की तिने मला विचारावं, आता पुढे काय? तू पण आर्टिस्ट आहेस मी पण आर्टिस्ट आहे. आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो आणि आम्ही लग्न करण्याचा विचार केला.
आमचं लग्नसुद्धा सहज झालं नाही. घरच्यांकडून आमच्या लग्नाला नकार होता. नट, आर्टिस्ट तो कसं घर सांभाळणार. त्यात ती बरीच हुशार. ती ९० टक्के मिळवणारी आणि आम्ही म्हणजे ४२ टक्के मिळाली तरी पार्टी असे ओरडणारे. त्यात माझ्या बायकोचे वडिल ब्रान्च मॅनेजर म्हणून रिटायर झालेले. आई शाळेत मुख्याध्यापिका होत्या. त्यामुळे तिचे कुटुंब हे शिक्षित असं होतं. पण सुनैना तेव्हा ठामपणे उभी राहिली आणि शेवटी आमचं लग्न झालं.
चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com