चित्रपट असो, मालिका असो किंवा एखादी जाहिरात असो हेअरस्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट अत्यंत महत्वाचे असतात. कारण- त्यांच्यामुळे कलाकार कॅमेऱ्यासमोर आणखी सुंदर दिसतात. कलाकाराच्या भूमिकेला साजेशी हेअरस्टाईल किंवा मेकअप हे आर्टिस्ट करीत असतात. मात्र, अनेक वेळा त्यांना काही कलाकारांकडून योग्य वागणूक दिली जात नाही. त्यांचा आदर केला जात नाही. याआधी अनेक वेळा हेअरस्टायलिस्ट किंवा मेकअप आर्टिस्ट यांना दिल्या गेलेल्या वाईट वागणुकीबद्दल बोलले गेले आहे. आता अशाच एका प्रसंगाविषयी बोलताना सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट हेमा यांनी दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर काम करण्याचा आपला अनुभव सांगितला आहे.

‘बॉलीवूड नाऊ’ या वृत्तवाहिनीबरोबर संवाद साधताना, हेमा यांनी दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर काम करण्याचा प्रसंग सांगितला आहे. त्या म्हणतात, “एकदा दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉलच्या शूटिंगसाठी चेन्नईला गेले होते. मी तिला वैयक्तिकरीत्या ओळखत नव्हते. माझ्या मैत्रिणीच्या मध्यस्थीने मी गेले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. एप्रिल, मेच्या उन्हात जिथे शूटिंग होणार होते, तिथे एकही झाड नव्हते. ऊन सहन होत नसल्याने मी आणि मेकअप आर्टिस्ट व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसलो. व्हॅनिटी व्हॅनमध्ये दोन भाग असतात. एक कलाकारांसाठी आणि दुसरा तांत्रिक भागातील लोकांसाठी असतो. त्यावेळी अमाला पॉलने तिच्या मॅनेजरला आम्हाला बाहेर पाठविण्यास सांगितले. त्यांना सांग की, व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसण्याची तुम्हाला परवानगी नाही. मॅनेजरने आम्हाला बाहेर जाण्यास सांगितल्यावर मेकअप आर्टिस्ट आणि मी एकमेकांच्या तोंडाकडे बघत होतो. पण, आमच्याकडे पर्याय नसल्याने आम्ही व्हॅनमधून खाली उतरलो.” यावर पुढे बोलताना त्या म्हणतात, “मला माहीत नाही की, जिथे मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टायलिस्ट यांना व्हॅनिटी व्हॅनमध्ये येण्याची परवानगी नाही, तिथे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कशा प्रकारे काम होतं? आम्ही त्यांना आमची ओळख कशी करून देणार? अशा कलाकारांना कोण सांगेल की, तब्बूसारख्या अभिनेत्रीबरोबर मी काम केले आहे; जी आपल्या हेअरस्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट साठी पूर्ण व्हॅन राखीव ठेवते. ज्यावेळी माझ्यासोबत हा प्रकार घडला, त्यावेळी माझ्याकडे शब्द नव्हते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत हे मोठ्या प्रमाणात घडते.”

हेही वाचा :‘सिंधूताई माझी माई’नंतर किरण माने झळकणार ‘या’ नव्या मालिकेत, म्हणाले, “अत्यंत निर्दयी, क्रूर…”

दरम्यान, दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉलने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती शेवटची पृथ्वीराज सुकुमारनसोबत ‘आदुजीवितम द गोट लाइफ’ चित्रपटात दिसली होती. त्याबरोबरच या अभिनेत्रीने तमीळ, तेलुगू व मल्याळम या भाषांतील चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.