#MeToo च्या यादीत आता महानायक अमिताभ बच्चन यांचेही नाव जोडले गेले आहे. सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट सपना भवनानीने महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप केले आहेत. मी अमिताभ बच्चन यांच्याबाबत अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी ज्या महिलांसोबत लैंगिक गैरवर्तन केले आहे त्या महिलांनीही पुढे येऊन बोलण्याची गरज आहे. ज्यामुळे तुमचा महानायकाचा बुरखा फाटेल अशा आशयाचे एक ट्विट सपना भवनानीने केले आहे.

तसेच ट्विटरच्या माध्यमातून सपना भवनानी यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना इशाराच दिला आहे. तुमचा पिंक सिनेमा आला आणि त्यात तुम्हाला जणू काही एक चळवळकर्ते म्हणूनच सादर केले गेले. मात्र तुमचे सत्य लवकरच बाहेर येईल याची मला खात्री आहे. MeToo या मोहिमे अंतर्गत जेव्हा तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांचे प्रकरण समोर आले तेव्हा अमिताभ यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी माझे नाव तनुश्री दत्ता नाही आणि नाना पाटेकरही नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र त्यांच्या वाढदिवशी म्हणजेच ११ ऑक्टोबरला आणि त्याआधी MeToo या मोहिमेबाबत ट्विट करत महिलांनी पुढे येऊन बोललं पाहिजे, अन्याय सहन करायला नको असे ट्विट केले होते.

या सगळ्या ट्विटचा आधार घेत सपना भवनानी यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही महिलांबद्दल लिहिलेले ट्विट हे धादांत खोटे आहेत. तुम्ही जे काही वागला आहात ते आठवून तुम्ही तुमची नखं कुरतडू नका, तुमचे सत्यही लवकरच बाहेर येईल आणि तुम्हालाही याची किंमत चुकवावी लागेल असेही सपना भवनानी यांनी म्हटले आहे. आत्तापर्यंत #MeToo मोहिमेत नाना पाटेकर, आलोकनाथ, पियुष मिश्रा, तन्मय भट्ट, कैलाश खेर यांसारख्या सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. अनेक महिला पत्रकारांनीही त्यांना आलेले अनुभव ट्विट केले आहे. आता सेलिब्रिटी हेयर स्टायलिस्ट सपना भवनानी यांनी अमिताभ बच्चन यांच्यावरही आरोप केले आहेत.

Story img Loader