फॅशन इंडस्ट्रीतील सगळ्यात मोठा सोहळा म्हणून नावाजला गेलेला ‘लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिव्ह २०१७’ मुंबईत पार पडला. हा सोहळा म्हणजे फॅशन डिझायनर्ससाठीच नाही तर बॉलीवूड सेलिब्रिटींसाठीही फॅशन आणि ग्लॅमरची नांदी असते. नामांकित फॅशन डिझायनर्सची वस्त्रप्रावरणे लेऊन टेचात रॅम्पवर येणारे बॉलीवूड अभिनेते-अभिनेत्री ही या शोची खरी ओळख आहे. वर्षांतून दोनदा होणाऱ्या या फॅशन सोहळ्यामध्ये डिझायनर्ससोबतच सेलिब्रिटींची मांदियाळी असते. मात्र या वर्षी रॅम्पवर कुठेही सेलिब्रिटी दिसले नाहीत. त्याउलट, काहींनी रेड कार्पेटवर चमकून जात काही क्षणांसाठी ग्लॅमरचा शिडकावा केला असला तरी रॅम्पवर तारे-तारका नसल्याने या सोहळ्याचा रंग अंमळ फिका पडला. जुन्या डिझायनर्ससोबतच दरवर्षी नवीन डिझायनर्सही आपली कला रॅम्पवर सादर करतात. जुने डिझायनर्स रॅम्पवर ‘शो स्टॉपर’ म्हणून सेलिब्रिटींना आणण्याच्या प्रयत्नात असतात आणि प्रेक्षकांचीही तीच अपेक्षा असते. मात्र यंदाच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये प्रेक्षकांच्या या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. रॅम्पवर शो स्टॉपर म्हणून सेलिब्रिटी नसण्यामागे अनेक कारणे असू शकतात. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर झाला आहे. फॅशन व कापड इंडस्ट्रीवर याचा सर्वाधिक वाईट परिणाम झाला आहे. यामुळे डिझायनर्सच्या आर्थिक गणितावरही साहजिकच परिणाम झाला असून कलेक्शन्सच्या तयारीमध्येच सर्व आर्थिक शक्ती खर्च झाल्यामुळे कदाचित या वर्षी सेलिब्रिटी शो स्टॉपर दिसण्याचे प्रमाण कमी झाले असावे, असे बोलले जात आहे. एखादा फॅशन शो हा प्रत्यक्ष रॅम्पवर दहा ते पंधरा मिनिटांचा असतो, मात्र त्यामागची तयारी अनेक तास, अनेक दिवस आणि कधी कधी अनेक महिन्यांचीही असते. या पंधरा मिनिटांच्या शोसाठी मॉडेल्सना रनवेवर चालण्याचा सराव  अनेक दिवस आधीपासून करावा लागतो, डिझाइन्सची फिटिंग्ज करावी लागतात. अर्थातच ‘शो स्टॉपर’लाही या सगळ्यासाठी आधीपासून वेळ काढावा लागतो. त्यामुळे सध्या बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत रमलेले सेलिब्रिटी रॅम्पवर कुठेच दिसत नाहीयेत. या वर्षी श्रद्धा कपूर, नर्गीस फाखरी, बानी कपूर अशी काही मोजकी नावे वगळता शो स्टॉपर म्हणून कोणीही उपस्थिती लावली नाही. याउलट दिया मिर्झा, नेहा धुपिया, मंदिरा बेदी अशा सेलिब्रिटींनी फक्त प्रेक्षक म्हणून हजेरी लावली. गेल्या चार दिवसांमध्ये रॅम्पवर शो स्टॉपर म्हणून दिसणारे सेलिब्रिटी चेहरे हे सध्या फिल्म इंडस्ट्रीमधले प्रकाशझोतातले चेहरे नाहीयेत. त्यामुळे लॅक्मे फॅशन वीकचे फिके पडलेले ग्लॅमरच लोकांच्या चटकन नजरेत आल्याशिवाय राहिलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा