कोणत्याही क्षेत्रातील कोणीही सेलेब्रिटी असला की त्याच्या कोणत्याही खासगी किंवा सार्वजनिक कृतीची समाजात आणि प्रसार माध्यमांमध्येही मोठय़ा प्रमाणात चर्चा होत असते. ही बाब जर त्यांच्या लग्नाबद्दल असेल तर याचे कवित्व दीर्घकाळ सुरू राहते. आता सध्या चर्चा आहे ती बॉलीवूडमधील अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नाची. दोघांचे लग्न झाले आणि आता रविवारी मुंबईत लग्नाचा स्वागत समारंभ ठेवण्यात आला आहे. या दोघांच्या लग्नाबरोबरच आणखी चर्चा झाली ती या दोघांच्या वयातील अंतराची. शाहीद हा मीरापेक्षा १५ वर्षांनी मोठा आहे. शाहीदचे वय ३४ तर मीरा राजपूतचे वय १९ आहे. पण बॉलीवूडमध्ये वयातील इतके जास्त अंतर असलेले हे काही पहिले जोडपे नाही. बॉलीवूडमधील अशाच काही सेलेब्रिटी जोडय़ांवर नजर टाकली तर पती-पत्नीमधील हे अंतर कमीत कमी १९ ते जास्तीत जास्त २३ वर्षे इतके असल्याचे पाहाला मिळत आहे.
बॉलीवूडमधील सगळ्यात जास्त अंतर असलेला विवाह सोहळा गाजला आणि चर्चेत आला तो दिलीपकुमार आणि सायरा बानू यांचा. १९६६ मध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले. तेव्हा दोघांच्या वयात थोडेथोडके नव्हे तर २२ वर्षांचे अंतर होते पण तरीही दोघांनी लग्न केले. सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचा विवाह २०१२ मध्ये झाला. करीनापेक्षा सैफ अली खान हा दहा वर्षांनी मोठा आहे. बॉलीवूडमधील वादग्रस्त आणि बहुचíचत अभिनेता संजय दत्त याचाही विवाह गाजला. संजय दत्त आणि मान्यता यांच्यात तब्बल २० वर्षांचे अंतर आहे. बॉलीवूडचा ‘ही मॅन’ धर्मेंद्र आणि ‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी यांच्या वयात १३ वर्षांचे अंतर आहे.
बॉलीवूडचा पहिला सुपरस्टार आणि त्या काळातील तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिम्पल कपाडिया यांचाही विवाह गाजला. राजेश खन्नाची लोकप्रियता इतकी होती की तरुणी त्याला आपल्या रक्ताने प्रेमपत्र लिहीत असत. राजेश खन्ना आणि डिम्पलचा विवाह झाला तेव्हा अनेक तरुणींना डिम्पलचा हेवा वाटला होता. या दोघांचे लग्न १९७३ मध्ये झाले. लग्नात दोघांच्या वयात १५ वर्षांचे अंतर होते. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचे लग्न आता तुटले असले तरी या दोघांनी जेव्हा लग्न केले तेव्हा दोघांमध्ये १२ वर्षांचे अंतर होते. अमृता सिंग ही सैफ अली खानपेक्षा १२ वर्षांनी मोठी होती. शिरीष कुंद्रा आणि बॉलीवूडची नृत्य दिग्दर्शिका फराह खान यांच्यात ८ वर्षांचे अंतर आहे.