महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास आगामी ‘ठाकरे’ या चित्रपटातून उलगडणार आहे. पण त्यापूर्वी हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात सापडला आहे. या बायोपिकमधील दोन दृश्य आणि तीन संवादांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्याची माहिती आहे. सेन्सॉरच्या आक्षेपानंतरही आज (बुधवारी) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असं शिवसेना खासदार संजय राऊत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत म्हणाले. ट्रेलर नियोजित वेळेनुसारच प्रदर्शित होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

संजय राऊत ‘ठाकरे’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार असून नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारत आहे. आज दुपारी दीड वाजता याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या ट्रेलरची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पण त्यापूर्वीच हा बायोपिक वादात अडकला आहे. ट्रेलर प्रदर्शनासाठी शिवसेना नेते सेन्सॉर बोर्डाची प्रक्रिया आणि संबंधित बाबींची पूर्तता करत असल्याचंही समजतंय.

संजय राऊत यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून त्यासाठी त्यांना चार वर्षे लागली. अभिजीत पानसे चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. २३ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या सिक्वलचाही विचार सुरू असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. ‘बाळासाहेब ठाकरेंचा जीवनप्रवास एका चित्रपटात दाखवू शकत नाही. त्यामुळे या बायोपिकच्या सिक्वलचाही विचार केला असून त्याच्यावरही काम सुरू केलं आहे,’ असं ते म्हणाले होते.

Story img Loader