‘पद्मावती’ या बिग बजेट चित्रपटाच्या वाटेतील एक अडथळा कमी होत नाही तोच दुसऱ्या समस्या नव्याने उभ्या राहात आहेत. सेन्सॉर बोर्डाकडून संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र देण्यात आले असले तरीही राजपूत करणी सेनेचा विरोध मात्र अद्यापही कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे. कारण अंडर्वल्डच्या भीतीमुळेच सेन्सॉरने हा निर्णय घेतल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे. सेन्सॉरने चित्रपटाला प्रमाणित करण्याचा निर्णय घेतला असला तरीही करणी सेना मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
सेन्सॉरने ‘पद्मावती’ चित्रपटाला प्रमाणित करत महत्त्वाचा निर्णय दिला. पण, त्यानंतर लगेचच करणी सेनेच्या सुखदेव सिंह गोगामेदी यांनी चित्रपटाला आपला आणि करणी सेनेचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. अंडरवर्ल्डच्या दहशतीपुढे सेन्सॉर बोर्डाने गुडघे टेकले असून, त्यानंतरच ‘पद्मावती’ चित्रपटाला प्रमाणित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी चित्रपटाला असणारा विरोध कायम असून, ज्या चित्रपटगृहांमध्ये ‘पद्मावती’ प्रदर्शित केला जाईल तेथे करणी सेनेचे कार्यकर्ते तोडफोड करतील असा इशारा दिला.
Our people will be outside cinema halls & each hall which shows the film will be vandalised. Members of committee formed to review the film have opposed it but censor board is taking this decision due to underworld pressure: Sukhdev Singh Gogamedi, Rajput Karni Sena #Padmavati pic.twitter.com/nTBdpstsIb
— ANI (@ANI) December 30, 2017
वाचा : व्होट बँकेच्या राजकारणामुळे ‘पद्मावती’ला डावलले; पहलाज निहलानींचा सेन्सॉर बोर्डावर आरोप
भन्साळींच्या या स्वप्नवत चित्रपटाच्या वाटेत येणारे अडथळे आणि चित्रपटाला होणारा विरोध पाहता शनिवारी या चित्रपटामध्ये काही बदल सुचवत सेन्सॉरने ‘पद्मावती’ला यू/ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. यावेळी चित्रपटाच्या नावतही बदल करण्याचे सुचवण्यात आले असून, ‘पद्मावती’ऐवजी ‘पद्मावत’ या नावाने चित्रपट प्रदर्शित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याशिवाय ‘घुमर’ या गाण्यातही बदल करण्यात येणार असून, हा एक काल्पनिक चित्रपट असून ऐतिहासिक घटनांशी त्याचा काही संबंध नसल्याचे चित्रपटाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात यावे असेही सेन्सॉरने घालून दिलेल्या अटींमध्ये म्हटले आहे.