आमिर खानच्या बहुचर्चित ‘पीके’ या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांना हटविण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी सेन्सॉर बोर्डाने धूडकावून लावली आहे. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी ‘पीके’मध्ये कोणतेही दृश्य आक्षेपार्ह नसून हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे असे म्हटले.
१९ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘पीके’ चित्रपटावर हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध दर्शविल्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला. चित्रपटात आमिर शंकराची भूमिका करणाऱ्या कलाकाराचा पाठलाग करताना दिसतो. चित्रपटात धार्मिक गुरूंबद्दलही उपहासात्मक टीका करण्यात आली आहे, या प्रकारच्या दृष्यांमुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता. त्यावर प्रत्येक चित्रपटातून कोणच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. पण त्यामुळे आम्ही विनाकारण चित्रपटातून दृश्य नाही हटवू शकत. एखादी कलात्मक गोष्ट तयार केली जाते जी लोक आपल्या पद्धतीने सादर करतात. आम्ही आधीच पीके चित्रपटाला प्रमाणपत्र दिले आहे. आता आम्ही कोणतेच दृश्य हटवू शकत नाही कारण हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, असे लीला सॅमसन म्हणाल्या. राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘पीके’ हा भारतातील स्वयंघोषित बाबांवर भाष्य करतो. यात आमिर खानने प्रमुख भूमिका साकारली असून, अनुष्का शर्मा, संजय दत्त, सुशांत सिंह राजपूत आणि बूमन इराणी यांच्याही भूमिका आहेत.

Story img Loader