बॉलीवूडचा छोटा नवाब सैफ अली खानला हॉटेलमध्ये अनिवासी भारतीयाला मारहाण प्रकरण चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. मुंबईतील न्यायालयाने सैफवर मारहाण प्रकरणी आरोप निश्चित केल्यामुळे त्याला प्रदान करण्यात आलेला मानाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार केंद्र सरकार काढून घेण्याच्या विचारात असल्याचे समजते.
मुंबईतील एका हॉटेलमध्ये अनिवासी भारतीयाला मारहाण केल्याचा ठपका सैफवर ठेवण्यात आला आहे. सैफसोबत त्याचे मित्र शकील लद्दाक आणि बिलाल अमरोही यांच्यावरही मारहाणीचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सैफला देण्यात आलेला ‘पद्मश्री’ सन्मान काढून घेण्यात यावा या आशयाची याचिका माहिती अधिकार कार्यकर्ते एससी अग्रवाल यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली होती. या मागणीवर आता गांभीर्याने विचार सुरू असल्याचे समजते. त्यामुळे सैफकडून ‘पद्मश्री’ पुरस्कार काढून घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
फेब्रवारी २०१२ मध्ये मुंबईतील एका मानांकीत हॉटेलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा उद्योगपती इक्बाल शर्मा यांनी सैफला हळू बोलण्यास सांगितल्याने सैफने रागाच्या भरात शर्मा व त्यांच्या सास-यांना मारहाण केली होती. त्यानंतर सैफ आणि त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा नोंदविण्यात आला. अटकही करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांची जामीनावर सुटका झाली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
मनोरंजन आणि कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सैफला २०१० साली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा