आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रेक्षकांना चार घटका विरंगुळा मिळावा यासाठी निर्माते राजू बंग आणि मैथ्थिली जावकर यांनी ‘छबू Weds बाबू’ हे दोन अंकी नवेकोरे विनोदी नाटक रंगभूमीवर आणले आहे. पिं.चिं.कलारंग प्रतिष्ठान निर्मित आणि अर्चना थिएटर्स प्रकाशित ’छबू Weds बाबू’ या नाटकाचं दिग्दर्शन अभिनेता व दिग्दर्शक असलेल्या प्रशांत विचारे यांनी केलं असून नाटकाचं लेखन राकेश नामदेव शिर्के यांचं आहे. गेली २३ वर्ष अभिनेत्री म्हणून कार्यरत असणाऱ्या मैथ्थिली जावकर यांचा रंगभूमी तसेच छोटया आणि मोठया पडद्यावरील अभिनयाचा प्रवास लक्षवेधी राहिला आहे. अभिनयाप्रमाणे निर्मितीक्षेत्रातही त्यांनी आपली छाप पाडली आहे. दहा वर्ष निर्माती म्हणून कार्यरत असणाऱ्या मैथ्थिली जावकर यांनी सह कुटुंब डॉट कॉम, वा सूनबाई वा, देखणी बायको दुसऱ्याची या सारख्या उत्कृष्ट नाटकांची निर्मिती केली आहे. आजवर १८ व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं असून दांडेकरांचा सल्ला, शोभायात्रा, चारचौघी, या दर्जेदार नाटकांचा त्यात समावेश आहे.
लग्न न करू इच्छिणाऱ्या पण घरच्यांच्या अटीमुळे लग्नाच्या बेडीत अडकलेल्या जोडप्याची ही धम्माल कथा आहे. हे लग्न यशस्वी होतं का ? ह्या जोडप्याला त्यांच्या प्रेमाची जाणीव होणार का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या नाटकात पहायला मिळतील. लग्न झाल्यानंतर एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात उडणाऱ्या धम्माल नात्याचा खट्टामीठा अनुभव ह्या नाटकातून आपल्याला घेता येईल. नेहमीच्या शाब्दिक कोटयांबरोबरचे उत्तम प्रसंग हे नाटकाचं वैशिष्टय आहे. मैथ्थिली जावकर, सुचित जाधव आणि विनोदाचा बादशाहा दिगंबर नाईक या तीन पात्रांभोवती या नाटकाची कथा गुंफण्यात आली आहे. प्रसंगनिष्ठ विनोदावर विलक्षण हुकूमत असलेले दिगंबर नाईक या नाटकात सूत्रधाराच्या भूमिकेत आहेत.
सात मजले हास्याची अनुभूती देणाऱ्या या विनोदी नाटकातून मराठमोळ्या अँग्री बर्ड्स चा तुफान मॅड कॉमेडीचा दंगा प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करेल असा विश्वास निर्माते राजू बंग व मैथ्थिली जावकर यांनी व्यक्त केला आहे. धम्माल विनोदाचा शिडकाव करणाऱ्या या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १५ ऑगस्टला होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा