एखाद्या चित्रपटाने किती लाख किंवा कोटी रुपयांचा व्यवसाय केला, यापेक्षा चित्रपटाची निर्मिती मूल्ये तपासली गेली पाहिजे. मनोरंजनासाठी अन्य माध्यम अग्रकमावर ठेवली जात असताना त्यात मराठी चित्रपटाकडे रसिकांनी वळावे आणि मराठी चित्रपटाला मोठे करावे, असे मत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुळकर्णी यांनी व्यक्त केले.
एका सामान्य माणसांच्या राजकीय प्रवासाची कथा असलेला ‘दुसरी गोष्ट’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चंद्रकांत कुळकर्णी नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. आतापर्यंत ९ चित्रपट दिग्दर्शित केल्यानंतर हा दहावा चित्रपट रसिकांसमोर घेऊन येत आहे. राजकीय विषय घेऊन तयार करण्यात आलेला हा चित्रपट कुठल्याही राजकीय पक्षातील नेत्यावर केंद्रित करण्यात आला नाही. एकूण लोकशाही परंपरेमध्ये जातीपातीने लगडलेल्या समाजातील एका खालच्या जातीतील मुलाची कथा या चित्रपटात सक्षक्तपणे मांडण्यात आली आहे. नायकाच्या जीवनातील चढ उतार दाखवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसात मराठी किंवा हिंदी चित्रपटाने किती कोटींचा व्यवसाय केला याची स्पर्धा सुरू असते, मात्र अनेक चित्रपट असे असतात की त्याचे मूल्य व्यवसायावर ठरवणे चुकीचे आहे. जास्त व्यवसाय केला की चित्रपट चांगल्या दर्जाचा आहे असे समजणे चुकीचे आहे. अनेकजण खोटे आकडे देऊन चित्रपटाचा प्रचार आणि प्रसार करीत असतात. मराठी चित्रपटाची जाहिरात करणे हे चित्रपट सृष्टीत मोठे आव्हान आहे.
मधल्या काळात हिंदी चित्रपटाच्या तुलनेत मराठी चित्रपटाचे मार्केटींग करण्यात आपण कमी पडत असल्यामुळे चित्रपटाला फारसे यश मिळत नव्हते. मात्र, गेल्या काही दिवसात मराठीमध्ये मार्केटींगचा ट्रेंड आला आहे. दूरदर्शवरील वाहिन्यांनी केलेल्या चित्रपटाची प्रसिद्धी संबंधीत वाहिनीवर केली जात असल्यामुळे त्यांना प्रसिद्धीसाठी दुसऱ्या माध्यमांची गरज नाही.
मात्र अन्य निर्मात्यासाठी मात्र वर्तमानपत्र, दूरदर्शनवर जाहिरात ही माध्यमे रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाची असतात. चांगली कलाकृती रसिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे त्यासाठी चांगली चित्रपटाची निर्मिती करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट फार दिवस टिकत नाही. चित्रपट क्षेत्र हा व्यवसाय असून त्यात मराठी चित्रपट टिकणे गरजेचे आहे.
दुसरी गोष्ट या चित्रपटात संवेदनशील मुद्यावर भर देण्यात आला आहे. अनेक नाटकीय वळणे बघायला मिळणार आहेत. चित्रपटात नायकाची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेते विक्रम गोखले साकारीत आहे. या चित्रपटाची निर्मिती डॉ. शैलजा गायकवाड, मंजिरी हेटे आणि प्रसाद महाडकर यांनी केली आहे. अभिजित गुरू यांनी सहदिग्दर्शक म्हणून चित्रपटासाठी काम केले आहे. उत्तम निर्मिती मूल्य, पटकथा आणि कसदार अभिनय याद्वारे चित्रपट दर्जेदार झाला आहे असेही कुळकर्णी यांनी सांगितले. यावेळी शैलजा गायकवाड, डॉ. मंजिरी हेटे, प्रसाद महाडकर आणि प्रशांत दळवी यांनी चित्रपटाविषयीचे अनुभव सांगितले.
चित्रपटाची निर्मिती मूल्ये तपासली गेली पाहिजे
एखाद्या चित्रपटाने किती लाख किंवा कोटी रुपयांचा व्यवसाय केला, यापेक्षा चित्रपटाची निर्मिती मूल्ये तपासली गेली पाहिजे.
First published on: 26-04-2014 at 03:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant kulkarni in nagpur for promoting his film dusari goshta