विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील गाणी, पोस्टर, ट्रेलर, टिझर सर्वच चर्चेचा विषय ठरत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक समीक्षक या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. नुकतंच हा चित्रपट पाहिल्यावर अमृता खानविलकरचा पती अभिनेता हिमांशू मल्होत्राने तिचे कौतुक केले आहे.
अमृता खानविलकरचा पती अभिनेता हिमांशू मल्होत्रा याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने अमृताच्या चंद्रमुखी चित्रपटाचे कौतुक केले होते. यात त्याने चंद्रमुखी या चित्रपटातील एका सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने दिलेल्या कॅप्शनमध्ये “अमृताचे कौतुक केले होते. अमृता मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे आणि मला तुझा खूप अभिमान वाटतो”, असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले होते.
“एक प्रेक्षक म्हणून…”, ‘चंद्रमुखी’ चित्रपट पाहिल्यानंतर अमृता खानविलकरच्या पतीची पहिली प्रतिक्रिया
हिमांशूची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. पतीच्या या पोस्टवर नुकतंच त्यावर अमृता खानविलकरने खास कमेंट शेअर केली आहे. यात ती म्हणाली, “तू हा चित्रपट पाहणे आणि त्यातून इतक्या गोष्टींबद्दल बोलणे हीच माझ्यासाठी उत्तम गोष्ट आहे… तू मला ज्या पद्धतीने जीवन जगताना पाहिले आहे, ते कोणीही पाहिले नाही. या सोनेरी शब्दांसाठी धन्यवाद…”, असे अमृताने म्हटले आहे. अमृताने शेअर केलेली ही कमेंट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
हिमांशू मल्होत्राने पोस्टमध्ये काय म्हटलंय?
“काल रात्री मी जे काही पाहिलं ते एका कलाकाराने दिलेले तेजस्वी सुख होतं. तू ज्या पद्धतीने चंद्रमुखी साकारली आहेस, ती मनाचा खोलवर ठाव घेणारी आहे. एक प्रेक्षक म्हणून मी त्यावेळी त्या चंद्रमुखीच्या प्रेमात पडलो. त्याक्षणी मला तिला माझ्यासोबत घेऊन जावंस वाटलं. तिचे संरक्षण करावंस वाटलं. मला त्यावेळी तिच्यातील वेदना जाणवल्या आणि मी तिच्यातील एक भाग आहे, असंही क्षणार्धात मला वाटलं. मनाचा घाव घेणारी, निष्पाप, खोलवर जखम झालेली असली तरीही तिचे शुद्ध अंतकरण पाहून मी भरुन पावलो आहे. तिच्या प्रवासाचे साक्षीदार झालेल्या सर्वांनाच तिने मोहिनी घातली आहे.”
“अमृता…. तुझ्या माध्यमातून तू आम्हा सर्वांना चंद्रमुखीच्या प्रवासाचे साक्षीदार बनवल्याबद्दल तुझे धन्यवाद. कलाकाराच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर येणारी प्रत्येक भूमिका ही एका खास हेतूसाठी येते आणि तो हेतू म्हणजे पुन्हा स्वत:शीच कनेक्ट होणे. कलाकार करत असलेली प्रत्येक भूमिका ही त्याच्या आत्मावर खोलवर ठसा उमटवते. चंद्रमुखी ही तुझ्यासाठी तेच करेल.”
“या प्रवासात तुला स्वत:चा खरा शोध घेण्यासाठी, पुढे जाण्यासाठी आणि पुन्हा मागच्या गोष्टींसोबत रि-कनेक्ट होण्यासाठी नक्कीच मदत करतील. अमृता मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे आणि मला तुझा खूप अभिमान वाटतो. लव्ह….”, असे हिमांशूने या पोस्टमध्ये म्हटले होते. त्यावर अमृताने ही प्रतिक्रिया दिली आहे.
“मराठी प्रेक्षक गेले कुठे?”, प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर यांची ‘ती’ पोस्ट व्हायरल
दरम्यान ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच हा चित्रपट मराठी चित्रपटाच्या यशातील एक महत्वाचा चित्रपट ठरताना दिसत आहे. तसेच जागतिक पातळीवरही हा चित्रपट सुपरहिट ठरताना दिसत आहे.