पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्याप्रमाणे दरवर्षी मुंबईला अमिताभ बच्चन यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या चित्रकार चंदू पाठक यांनी या वर्षीही आपल्या शिरस्त्याचे पालन करीत नुकतीच मुंबईत महानायकाची भेट घेऊन ‘सरकार’ या चित्रपटातील पेंटिंग भेट स्वरूपात दिले.
येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत चंदू पाठक व अमिताभ बच्चन यांचे गेल्या १६ वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. या ऋणानुबंधातूनच पाठक दरवर्षी अमिताभ यांच्या भेटीला जातात. महानायक अमिताभ बच्चनदेखील तेवढय़ात आत्मीयतेने पाठक यांची भेट घेऊन चौकशी करतात. हे ऋणानुबंधाचे नाते अविरत आहे. गेल्या आठवडय़ात पाठक यांनी अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. विदू विनोद चोपडा यांच्या वजीर या चित्रपटाच्या सेटवर महानायकांना त्यांचे सरकार या चित्रपटातील चित्र भेट देऊन पाठकांनी त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली.  या प्रसंगी वजीरचे सहकलाकार फरहान अख्तर उपस्थित होते. महानायकाची पेंटिंग बघून अभिनेता फरहान अख्तर यांनी पाठक यांच्या कलेची मुक्तकंठाने प्रशंसा केली. विशेष म्हणजे यावेळी स्वत: बीग बी यांनी पाठक यांच्या पेंटिंग त्यांच्या चित्रगॅलरीची शोभा वाढवत असल्याची माहिती सहकलाकारांना दिली. ही पेंटिंग बघून भारावलेले बच्चन यांनी पाठक यांना तिथे थांबवून घेतले. यानंतर वजीर या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी उपस्थित असलेल्या सर्व कलावंतांसोबत मेजवानी घेण्याची संधी पाठक यांना प्राप्त झाली. पाठक यांची मुंबईवारी व महानायकाची भेट मावळत्या वर्षांत त्यांच्यासाठी निश्चितच आनंद देणारी राहिली.

Story img Loader