सध्या कलाकार नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तीनही माध्यमातून व्यग्र असतात. अशा वेळी त्यांना मालिका/चित्रपटाचे चित्रीकरण किंवा नाटकाच्या प्रयोगाच्या तारखा सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. पण आपापसातील समन्वयाने आपल्या भूमिकांची अदलाबदल केली तर त्याचा फायदा त्या कलाकारांबरोबरच मालिका किंवा नाटकाच्या संपूर्ण चमूलाही होतो. हे बदल सर्वाच्याच पथ्यावर पडतात.
सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या ‘वासूची सासू’ या नाटकातील कलाकारांनी आपापसात परस्पर सामंजस्याने भूमिकांची अदलाबदल केल्याने नाटकाचे प्रयोग कोणताही खंड न पडता विनासायास सुरू राहिले आहेत.
हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणण्याचे ठरले तेव्हा यातील ‘वासू’च्या भूमिकेसाठी अगोदर शेखर फडके याचे नाव निश्चित करण्यात आले होते. मात्र त्या वेळेस शेखर अन्य चित्रीकरणात व्यग्र असल्याने त्याला नाटकासाठी वेळ देणे शक्य नव्हते. मग त्याच्याऐवजी अन्य नावांचा विचार सुरू झाला आणि विक्रम गायकवाडचे नाव नक्की झाले. त्याच वेळी त्याची ‘उंच माझा झोका’ ही मालिका नुकतीच संपल्याने आणि नवीन काही सुरू नसल्याने विक्रमने होकार दिला. विक्रमला घेऊन नाटकाच्या तालमी सुरू झाल्या आणि नाटकाचे प्रयोग रंगमंचावर सुरू झाले.
प्रयोग सुरू असतानाच विक्रमला एका मराठी मालिकेसाठी सलग काही महिन्यांच्या तारखा देणे आवश्यक होते. त्यामुळे तो प्रयोग करू शकणार नव्हता. त्याच वेळी शेखर त्याच्या अगोदरच्या चित्रीकरणातून मोकळा झाला असल्याने ‘वासू’च्या भूमिकेसाठी त्याला विचारण्यात आले आणि त्याने होकार दिल्यानंतर विक्रमऐवजी शेखर ती भूमिका करू लागला. त्यानेही नाटकाचे काही प्रयोग केले. आता पुन्हा नाटकात विक्रमचा प्रवेश झाला आहे.
या संदर्भात नाटकाचे दिग्दर्शक मंगेश कदम यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले की, शेखर आणि विक्रम या दोघांच्या परस्पर सामंजस्यामुळेच हे होऊ शकले. आता शेखर एका नव्या हिंदी मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तर विक्रम मराठी मालिकेच्या चित्रीकरणातून मोकळा झाल्याने शेखरच्या जागी पुन्हा विक्रम आला आहे. विक्रमच्या जागी शेखर आला तेव्हा आम्ही त्याच्यासोबत नव्याने तालीम करूनच हे नाटक बसविले.
 ‘दीपस्तंभ’च्या वेळीही अदलाबदल
काही वर्षांपूर्वी ‘दीपस्तंभ’ हे नाटक रंगभूमीवर सादर झाले होते. संजय मोने व गिरीश ओक यांच्या त्यात मुख्य भूमिका होत्या. मात्र ऐनवेळी संजय मोने आजारी पडल्याने त्याच्याऐवजी त्याची भूमिका अच्युत देशिंगकर यांनी केली. अर्थात संजय मोने बरा होऊन पुन्हा काम करत नाही तोपर्यंतच देशिंगकर यांनी ती भूमिका करायची असे ठरले होते. संजय मोने बरा झाल्यानंतर देशिंगकर यांनी नाटक सोडले आणि संजय ती भूमिका करू लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा