पडदा उघडतो तेव्हा खुर्चीवर बसलेल्या उत्तराला डॉ. पानसरे तपासताहेत. काहीशा अनिच्छेनंच. तिची अखंड बडबड सुरू आहे. आपल्या आजारपणाबद्दल. आणि इतरही. डॉक्टर तिला सांगतात, ‘तुम्हाला काहीही झालेलं नाही.’ ती अविश्वासानं डॉक्टरांकडे पाहते. ‘तुम्हाला काहीच कळत नाही..’ या अर्थानं. इतक्यात घाईघाईनं मैत्रेयी येते. ‘आईला काय झालंय?’ असं विचारते. डॉक्टर मघाचंच उत्तर देतात. त्यावर उत्तरा मैत्रेयीकडे डॉक्टरांची तक्रार करते. त्यांना माझा आजारच कळत नाही, म्हणते. त्यावरून दोघींची शाब्दिक झकाझकी होते.
एव्हाना वरकरणी सारं ठाकठीक दिसत असलं तरी उत्तराच्या बाबतीत काहीतरी गडबड आहे हे आपल्या ध्यानात येतं.
ती मैत्रेयीला खोदून खोदून प्रश्न विचारते : कुठे गेली होतीस? कुणाबरोबर गेली होतीस? काय करत होतीस?
मैत्रेयी तिला खरं काय ते सांगून टाकते. ‘असीमला भेटायला गेले होते. तो मला आवडतो. मीही त्याला आवडत असावी असं वाटतं..’ वगैरे.
त्यावर तिच्याकडे संशयानं पाहत उत्तरा तिची उलटतपासणी घेते. त्यानं मैत्रेयी कावते. आधीच वय वाढत चाललंय. आणि अद्याप आपल्या आयुष्यात काहीच धडपणे न झाल्यानं मैत्रेयी बेचैन, अस्वस्थ आहे. तशात आईच्या अशा सततच्या आजारपणानं आणि विचित्र वागण्यानं ती अधिकच कातावलीय. त्या दोघी एकत्र असताना त्यांच्यात संवादापेक्षा वितंडवादच जास्त होतो. घरात उत्तराला ती आणि तिला उत्तरा याशिवाय तिसरं कुणीच नसल्यानं घरची जबाबदारी मैत्रेयीवरच आहे. ती तिच्या परीने ती निभावायचा प्रयत्न करतेय. पण आईचं सततचं रडगाणं आणि वितंडवाद तिच्या डोक्यात जातो. पण हे सहन करण्यावाचून तिच्यासमोर पर्यायही नाहीए. विशेषत: मैत्रेयीचं कुणा तरुणासोबत मैत्र वाढतंय असं उत्तराला जाणवलं, की ती सैरभैर होते. तिला त्याच्यापासून सावध राहायला परोपरीनं सांगते. कधी मैत्रेयीचा आत्मविश्वास खच्ची करून, तर कधी तिच्या मनात नस्ती भीती उत्पन्न करून उत्तरा तिला मित्रापासून दूर करू बघते. अनेकदा तर त्यासाठी नाना हिकमतीही लढवते. त्याच्याबद्दल मैत्रेयीच्या मनात वाईटसाईट भरवून देते. मैत्रेयी तशी सरळ मुलगी असल्यानं आईचं म्हणणं तिला कधी कधी पटतंही. म्हणूनच तर ती लग्नाचं वय उलटून चाललं तरी अद्याप बिनलग्नाची राहिलीय.  
असीमच्या बाबतीतही उत्तरा तिचा नेहमीचा हुकमी डाव हुशारीनं खेळते. मैत्रेयी त्याला फशी पडते. एकीकडे असीमबद्दल वाटणारा विश्वास आणि दुसरीकडे आईचं त्याच्याबद्दलचं मत या दुविधेत ती सापडते. शेवटी नेहमीप्रमाणे उत्तराचा विजय होतो. तिच्यासाठी आपल्या प्रेमाला तिलांजली देऊन मैत्रेयी असीमला दूर करू इच्छिते. पण तिच्याशीच लग्न करण्याच्या ठाम निर्णयाप्रत तो आलेला असतो. नाना परीनं तो तिला समजवायचा प्रयत्न करतो. पण ती त्याचं म्हणणं काना/मनाआड करते. शेवटी हतबल असीम तिच्या हट्टापुढे हात टेकतो आणि तिच्या आयुष्यातून निघून जातो.
परंतु डॉ. पानसरे उत्तराचा हा जीवघेणा खेळ जेव्हा मैत्रेयीच्या लक्षात आणून देतात तेव्हा ती सर्वस्वानं उद्ध्वस्त होते..
लेखिका इरावती कर्णिक यांनी निकट नात्यातलं हे तरल, मनोविश्लेषणात्मक नाटक अतिशय सफाईनं रचलं आहे. ठोस व्यक्तिरेखा आणि संहितेत योजलेली ‘आज’ची भाषा यामुळे हे नाटक मनोविश्लेषणात्मक नाटकांच्या प्रचलिततेला सकारात्मक छेद देतं. पात्रांचे भावनिक-मानसिक आंदोळ, त्यांच्या अंतर्मनातील हालचाली आणि त्यातून उद्भवणाऱ्या प्रतिक्षिप्त क्रिया यांवर लेखिकेनं नाटकात भर दिला आहे. त्यामुळे ही पात्रं लगोलग आपला कब्जा घेतात. डॉ. पानसरे हे पात्र मात्र काहीसं उपरं वाटतं. (जरी नाटकात त्याला ‘सूत्रधारी’ स्थान आहे.) आणखी एक गोष्ट पचवणं जड जातं. ती म्हणजे- उत्तरानं आपला ‘डाव’ उघडकीस आल्यानंतर केलेला कांगावा तसंच आपल्या उपेक्षेची कथन केलेली गोष्ट- जी त्यातल्या सोसलेपणासह प्रयोगात न आल्यानं उत्तरेच्या वर्तनामागील कार्यकारणभाव स्वीकारार्ह वाटत नाही. नवऱ्याकडून उपेक्षिली गेलेली, प्रतारणा झालेली उत्तरा त्याच्या पश्चात त्याच्या फोटोला हार घालेल? खरं तर घरात ती त्याचं नामोनिशाणही शिल्लक ठेवू इच्छिणार नाही. पण इथं तसं झालेलं नाही. असं असताना उत्तरेनं आपला नवऱ्यावरचा कथित राग आपल्या मुलीच्या भवितव्यावर काढावा? पटणं काहीसं अवघड आहे बुवा! आयुष्याच्या मावळतीला आपण एकाकी पडू, या भयगंडातून तिनं मुलीनं आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून कारवाया करणं एक वेळ विश्वासार्ह वाटेल. तसं तर तिनं उभं आयुष्य नवरा आणि मुलगी असूनही एकाकीच काढलंय की! पण मग तिच्या अस्थिर मनोवृत्तीला आणखीन काहीतरी ठोस कारण द्यावं लागेल. दुसरीकडे, उत्तराच्या सान्निध्यानं आत्मविश्वास गमावून बसलेली मैत्रेयीही आता तिच्याच मार्गानं जाणार काय, अशी आशंका मनात येते. तसं सूचन काही प्रसंगांत आहे. आणि इथूनच नाटक पकड घेऊ लागतं. उत्तरानं मैत्रेयीच्या डोक्यात असीमबद्दल जे काही भरवून दिलेलं असतं त्यामुळे ती भलतीच संभ्रमात पडते. खरं काय, खोटं काय, हेच तिला आकळेनासं होतं. असीम आणि आपल्यातलं नातं नेमकं काय प्रकारचं आहे, याबद्दलच ती दुविधेत पडते. एकीकडे तिला त्याच्या सच्चेपणाबद्दल खात्री वाटते; पण त्याचवेळी उत्तरानं त्याच्याबद्दल मनात भरवून दिलेल्या आशंकांनी ती विद्धही झालीय. या गोंधळी मानसिक अवस्थेतून ती असीमपासून दूर जाण्याचं ठरवते. असीमनं आपल्या प्रेमाची खात्री पटवूनही ती त्याला जबरदस्तीनं आपल्यापासून दूर करते. परंतु डॉक्टर जेव्हा उत्तरेच्या वर्तनामागील तिचा खरा हेतू मैत्रेयीला सांगतात तेव्हा ती कोसळतेच. त्या क्षणी ती ज्या तऱ्हेनं रिअ‍ॅक्ट होते, तो नाटकातील अनपेक्षित नाटय़पूर्ण क्षण होय. खरं पाहता नाटकात पेरलेली ही अनपेक्षितताच प्रेक्षकाला चकवा देत राहते आणि त्याला खुर्चीला बांधून ठेवते.   
दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी मनोविश्लेषणात्मकतेचा हा पोत नाटकभर अप्रतिम खेळवला आहे. ठोस व्यक्तिचित्रणाबरोबरच सतत अनपेक्षिततेचे धक्के प्रेक्षकाला बसत राहतील याची तजवीज त्यांनी केली आहे. आणि हेच या नाटकाचं वेगळं वैशिष्टय़ आहे. हल्ली ही अनपेक्षितताच मराठी नाटकांतून बाद झालेली दिसते. संहितेतल्या कोऱ्या जागा दिग्दर्शकाने तलम कलाकुसरीनं भरून काढल्या आहेत. उत्तराचं विक्षिप्त वर्तन तसंच असंबद्ध बोलण्यातून अभावितपणे घडणारा विनोदही त्यांनी सहज बाहेर काढला आहे.
उत्तरा हे पात्र रीमा यांनी इतक्या बारकाव्यांनिशी साकारलं आहे, की पूछो मत! अभिनयातली चतुरस्रता आणि भूमिकेची खोल समज यामुळे त्यांची उत्तरा संस्मरणीय झाली आहे. विशिष्ट जेश्चर-पोश्चरमधूनही त्यांनी तिला एक वेगळी मिती दिली आहे. तीच गोष्ट मुक्ता बर्वे यांच्या मैत्रेयीची. अखंड वेदना जगणारी एक मुलगी त्यांच्या रूपानं आपल्यासमोर वावरतेय असं कायम वाटत राहतं. विशेषत: त्यांच्या आवाजातला दर्द आणि भिजलेपण बरंच काही व्यक्त करतं. पूर्वार्धात आईच्या सापळ्यात अडकलेली एक अश्राप मुलगी त्याचप्रमाणे उत्तरार्धात आपल्या शर्तीवर तिला वागा-जगायला लावून तिला शह देणारी मैत्रेयी त्यांनी तितक्याच निर्धारानं साकारली आहे. एकीकडे आईचं ‘खल’ वर्तन आणि तरी तिच्याप्रती आपलं दायित्व निभावण्याची मैत्रेयीची कसोशी, तर दुसरीकडे असीमचं प्रेम नाकारल्याचा झालेला पश्चात्ताप, मानसिक क्लेश यांत होत असलेली तिची घुसमट त्यांनी उत्कटतेनं व्यक्त केलीय. आशीष कुळकर्णीनी असीमचं मनस्वीपण उत्तम दाखवलंय. डॉ. पानसरेंच्या भूमिकेत श्रीराम गाडगीळही चोख आहेत.   
प्रसाद वालावलकरांनी नाशिकमधलं मैत्रेयीचं टुमदार, छोटेखानी घर त्यातल्या बारकाव्यांनिशी वास्तवदर्शी उभं केलंय. नाटकाचा आशय व पोत नरेंद्र भिडे यांच्या पाश्र्वसंगीतानं अलवारपणे अधोरेखित झाला आहे. हेमंत कुलकर्णीच्या प्रकाशयोजनेतून नाटय़ांतर्गत तणाव अधिक ठाशीव झालेत.  
अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी या नाटकाद्वारे प्रथमच निर्मितीच्या क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. आणि आपल्या पहिल्याच नाटय़कृतीतून एक निर्माती म्हणून आपण रंगभूमीकडे किती गांभीर्यानं पाहतो आहोत, हा विश्वासही त्यांनी रसिकांना दिला आहे. त्यामुळे येत्या काळात एक निर्माती म्हणूनही आपल्याबद्दलच्या अपेक्षा त्यांनी वाढविल्या आहेत.

Story img Loader