‘..डोळ्यांमधले खारट पाणी.. गालांवरती ओघळणार्‍या मंद मंद हासूचे चार दिवस सासूचे’, हे शब्द कानावर पडले की आजही आठवते ती म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाच्या मनावर अधिराज्य गाजलेली मालिका ‘चार दिवस सासूचे’. आपला संसार सुखी करण्यासाठी, सासरच्या अंगणात आयुष्यभर चंदनासारखी झिजणारी सून. सासरच्या अंगणात नांदायला आलेली ही सून कालांतरानी सासू होते. नवी सून घरात येते आणि एका ‘तिखट गोड’ नात्याची सुरुवात होते. थोडा संघर्ष, थोडी कुरबुर, थोडी माया असणारं एक नातं म्हणजे सासू-सुनेचं नातं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आई आणि सासू या एकाच नाण्याच्या दोन बाजू. आईची सासू होतानाची घालमेल, तिचे विचार, तिची भीती हे कोणीच समजू शकणार नाही. मुलाचे लग्न हे आईच्या जीवनातील परमोच्च सुख. प्रत्येक आईचे तिच्या मुलांच्या लग्नाविषयी, तिच्या होणार्‍या सुनेविषयी स्वप्न असतात. ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका देखील याच कथासुत्रावर आधारलेली आहे. आशालता देशमुख यांची देखील त्यांच्या मुलाच्या लग्नाविषयी अशीच स्वप्न आहेत. पण जेव्हा त्यांचा मुलगा घरात अनुराधाला सून म्हणून घेऊन येतो तेव्हा काय होतं? आशालता देशमुख यांचे मन ती कसं जिंकणार? अनुराधा घर कसं सांभाळेल हे एकंदरीत या मालिकेत पाहायला मिळतं. आशालता देशमुख यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि अनुराधाची भूमिका कविता लाड – मेढेकर हिने साकारली आहे. ही मालिका ३ ऑगस्टपासून रात्री ९.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आशालता देशमुख हे खूप मोठ प्रस्थ आहे. घरामध्ये त्यांचा शब्द शेवटचा मानला जातो आणि त्यांनी घेतलेला निर्णय कोणी बदलू शकत नाही. रवी म्हणजेच आशालता यांचा मुलगा त्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन त्यांच्या अपरोक्ष अनुराधाशी लग्न करतो आणि तिला सून म्हणून घरी आणतो. अनुराधा अत्यंत साधी, समंजस, स्वाभिमानी मुलगी. रवीने त्यांच्या आईच्या विरोधात जाऊन लग्न केले आहे ही गोष्ट अनुराधाला माहिती नाही. देशमुखांच्या घरात ती सून म्हणून येते आणि तिच्या खर्‍या प्रवासाला सुरूवात होते. “तुझं माझं” या वाटणीत भावनांचा – नात्यांचा कस पणाला लागतो आणि उरतो तो गृह कलह. अनुराधा घराला कशी सांभाळते, तिच्या वाटेवर आलेल्या संकटांना ती कशी खंबीरपणे सामोरी जाते ? या संघर्षात तिला रवीची साथ मिळते का याची कथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Char diwas sasuche popular serial to start soon on colors marathi ssv