दोन महिन्यांपूर्वीच वाळूमाफियांच्या आयुष्यात डोकावणारा, वाळूउपशामागे दडलेल्या विनाशाची जाणीव करून देणारा ‘रेती’ हा चित्रपट केल्यानंतर लेखक देवेन कापडनीस यांनी जमीन विक्री व्यवहारातून निर्माण होणारी दलालांची साखळी आणि त्यामुळे विनाकारण भरडला जाणारा सामान्य माणूस यांची कथा ‘बरड’ चित्रपटातून रंगवली आहे. ओसाड जमिनीत जिथे काहीच पिकत नाही तिथे एक अफवा पिकल्यानंतर होणाऱ्या घडामोडींचे वास्तव चित्रण करणाऱ्या या चित्रपटाविषयी खुद्द लेखक, दिग्दर्शक तानाजी घाडगे आणि कलाकार सुहास पळशीकर, भारत गणेशपुरे यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
या चित्रपटाच्या विषयातलं वास्तव हे आपल्याला नेहमी समोर दिसणारं पण न जाणवणारं असं आहे. त्याविषयी बोलताना देवेन सविस्तर समजावून सांगतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर रिअल इस्टेटमध्ये १० टक्क्यांच्या वर कधीही गुंतवणूक करा म्हणून सांगितले जात नाही, पण भारतात ९० टक्के गुंतवणूक ही रिअल इस्टेटमध्येच असते. असं का होतं? कुठेतरी विमानतळ होणार म्हणून घोषणा होते आणि मग त्या जमिनीचा भाव अवाच्या सव्वा वाढतो. नाशिकमध्ये पाच वर्षांपूर्वी आयटी पार्क येणार म्हणून घोषणा झाली. जवळपास पाचपटीने दोन वर्षांत जमिनींचे भाव वाढले पण आयटी पार्क कधी झालंच नाही तिथे.. म्हणजे अमूक एक जमिनीचा विकास होणार म्हणून आवई उठवायची. तिथल्या परिसरातील जागांचे भाव वाढवून आर्थिक फायदा घ्यायचा ही मोडस ऑपरेंडी आहे. आज यातून देशभरात जमीन विक्री व्यवहारांबाबत जे काही चाललं आहे ते एका गावाच्या रूपाने प्रतिकात्मकतेने मांडण्याचा प्रयत्न ‘बरड’ या चित्रपटातून करण्यात आला आहे, असं देवेन सांगतात. ‘बरड’ म्हणजे नापिक, ओसाड जागा. गावातल्या या ओसाड जागेत जिथे काहीच पिकत नाही तिथे एक अफवा पिकते आणि त्या अनुषंगाने एक एक घडामोडी होतात. एरव्हीही एखादी जागा विकसित होणार आहे म्हटल्यावर तिथल्या जागांची चौकशी करण्यासाठी बाहेरची लोकं येतात. तिथल्या पानवाल्याकडे विचारणा करायला लागतात आणि मग तो पानावालाही इस्टेट एजंट बनून जातो. आज संपूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीने भूमाफियांचे जाळे पसरले आहे, हा गंभीर विषय चित्रपटात असला तरी तो सटायरिकल पद्धतीने मांडला असल्याचे त्यांनी सांगितले.
या चित्रपटाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलं आहे. स्वत: ग्रामीण भागातील असल्याने तो अनुभव आणि माडगूळकर, शंकर पाटील यांच्यासारख्या लेखकांची पुस्तके वाचत लहानाचा मोठा झालो असल्याने अशा चित्रपटात ग्रामीण जनजीवनात ठासून भरलेला बेरकेपणा पडद्यावर मांडण्यात जास्त मजा येते, असं तानाजी सांगतात. मुळात शहराबाहेरच्या जमिनींमध्ये कित्येकदा छोटे छोटे प्लॉट्स आणि त्याच्याभोवती घातलेली कुंपणं आपल्याला दिसतात. एवढय़ा जमिनी कोण विकत घेत असतील? या एका विचारातून चित्रपटाचा प्लॉट मिळाला आणि मग तो विकसित करत असताना मालमत्तेच्या या हव्यासामागची त्यांची कारणं काय असतात? आज ग्रामीण भागातही शहरी जीवनाचं आकर्षण मोठं आहे. आणि मग अशाप्रकारे कुठल्या तरी बरड जागेतून पैसा मिळणार म्हटल्यावर आपल्याही मुलाला मोठय़ा शाळेत टाकण्यापासून ते पैसे उडवण्यापर्यंतची अनेक स्वप्नं अशी उफाळून बाहेर पडतात. लोकांचं जगणं बदलतं. ते त्या स्वप्निल पैशाकडे धावत सुटतात. पण तो मिळण्याआधीच स्वप्नांचा फुगा फुटतो आणि वास्तवाचं भान आल्यावर त्यांचं काय होतं? हा प्रवास या चित्रपटात रंगवला असल्याचं तानाजी यांनी सांगितलं.
या चित्रपटाच्या निमित्ताने सुहास पळशीकरांसारखे सक्षम ज्येष्ठ अभिनेते आणि आजच्या पिढीत लोकप्रिय असणारे अभिनेते भारत गणेशपुरे यांनी एकत्र काम केले आहे. पळशीकर नेहमीच निवडक भूमिकांमधून समोर आले आहेत. त्याविषयी सांगताना मुळात भूमिकेची पुनरावृत्ती असेल तर तो चित्रपट करतच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आणि दुसरे म्हणजे चित्रपट करण्यापूर्वी आधी मी पटकथा मागतो. माझ्यासाठी भूमिकेची लांबी महत्त्वाची नसते. तर छोटी असली तरी ती महत्त्वाची असावी, एवढाच आपला हट्ट असतो, असं ते सांगतात. ‘बरड’मध्ये ते श्यामराव अण्णा या गावाच्या दृष्टीने आदर्श असलेल्या व्यक्तीच्या भूमिकेत आहेत. श्यामरावांच्या हातून एक गोष्ट घडली आहे. मात्र ती समजून घेण्याआधीच त्याच्यावरून अफवा रंगू लागतात आणि मग गावातले तरुण त्याला बळी पडतात. कधीतरी त्यांना सत्य समजेल या आशेपोटी संयमाने परिस्थिती हाताळू पाहणारी अशी ही व्यक्तिरेखा आहे. किंबहुना त्याहीपेक्षा एक कुंपण, एक अफवा आणि संपूर्ण आदर्श गावाचा धुव्वा अशी वेगळी कल्पना असलेला ‘बरड’ पाहावा, असा आग्रह ते धरतात. प्रत्येकाची शैली महत्त्वाची असते. लोकांची व्यथा ही प्रसंगातून कधी विनोदी चिमटे काढत प्रेक्षकांपर्यंत पोहोचली पाहिजे. सुरूवातीपासूनच दयेची भीक मागणारा चित्रपट नसावा आणि ‘बरड’ या कसोटीवर खरा उतरला आहे, असं ते म्हणतात.
मराठी कलाकार स्वत:च्या प्रसिद्धीत कमी पडतात – भारत गणेशपुरे
मराठीत मोठय़ा कलाकारांचे किंवा मुख्य प्रवाहातीलच चित्रपट चालण्याचे प्रमाण कमी आहे. कारण मुळात मराठी प्रेक्षक चोखंदळ आहे. त्यांच्यादृष्टीने विषयाचं नावीन्य महत्त्वाचं असतं. म्हणजे फँड्री आला तेव्हा नागराज मंजुळेला कोणी ओळखत नव्हतं, पण त्याच्या विषयामुळे प्रेक्षक आपोआप तिथे ओढले गेले. मराठीत नाटकांचंही तसंच आहे. दरवर्षी मराठी नाटकांमध्ये कमीतकमी २० नवीन विषय येतात. हिंदीत अजूनही पृथ्वीला धर्मवीर भारती किंवा तेंडुलकरांची नाटके चालतात. हा फरक प्रेक्षकांनाही जाणवतो. त्यामुळे कित्येकदा माझे हिंदीतील मित्र मला म्हणतात, ‘अरे! मराठीत तुमच्याकडे फार वेगळे आणि चांगले विषय येतात.’
मराठीत कल्पना आणि गुणवत्तेची कमी नाही पण मार्केटिंगमध्ये आपण कमी पडतो. याबाबतीत त्यांना आलेला गमतीदार अनुभवही त्यांनी सांगितला. वैयक्तिक प्रसिद्धी करण्यासाठी कलाकार कित्येकदा तयार नसतात. मात्र, लोक वर्षांनुवर्षे डोळे झाकून ‘कोलगेट’सारखे जे ब्रँड वापरतात, त्यांनाही अजून जाहिरातीची गरज भासते. मग कलाकारांना आपल्या कामाची प्रसिद्धी करण्यात कं टाळा का येतो?, असा प्रश्न एकाने विचारल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या ‘चला हवा येऊ द्या’ हा शो आणि चित्रपट अशी तारेवरची कसरत सांभाळणाऱ्या भारत गणेशपुरे यांनी या शोची लोकप्रियता नेमकी कोणकोणत्या पद्धतीने वाढत चालली आहे, हेही सांगितले. मुळात हा शो प्रेक्षकांच्या थेट काळजाला भिडणारा आहे. या शोमुळे आमच्या नाटकाची, चित्रपटाची बुकिंग्ज काही पटीने वाढली हे सांगणारे निर्माते आपल्याला भेटतात, असं ते म्हणतात. शोमध्ये होणारी चर्चा ऐकून चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांचं प्रमाण वाढलं आहे. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस हा शो बघत असल्याने प्रसिद्धीसाठी हिंदीतील लोकांनाही हा शो महत्त्वाचा ठरू लागला आहे. म्हणूनच आता शाहरुख, सोनम, जॉनपाठोपाठ विद्या बालन आणि सलमान खानही या शोमध्ये दाखल होणार आहेत, असं त्यांनी सांगितलं. पण या सगळ्याच मोठय़ा कलाकारांना ही आपल्या गरजेची गोष्ट आहे हे पक्कं माहिती असतं, त्यामुळे व्यावसायिकतेचं भान राखूनही ही मंडळी मनापासून या शोत सहभागी होतात, असं त्यांनी सांगितलं. ‘बरड’मध्ये ग्रामीण भागातलं कॅ रेक्टरलेस कॅरेक्टर आपण रंगवलंय असं ते गमतीने सांगतात. पण ‘बरड’सारखेच विषय आजचा मराठी प्रेक्षक उचलून धरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jun 2016 रोजी प्रकाशित
‘बरड’ जमिनीवर पिकते अफवा
या चित्रपटाच्या विषयातलं वास्तव हे आपल्याला नेहमी समोर दिसणारं पण न जाणवणारं असं आहे.
Written by रेश्मा राईकवार

First published on: 19-06-2016 at 00:55 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chat with cast and crew of marathi movie barad