मिचौंग या चक्रिवादळाचा फटका तामिळनाडूला मोठ्या प्रमाणावर बसला. प्रचंड पावसामुळे चेन्नईतही पूर आला. चेन्नईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं होतं. सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरातही पाणी शिरलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. चेन्नईतल्या पोएस गार्डन या भागात अभिनेते रजनीकांत यांचं घर आहे.
व्हायरल व्हिडीओत नेमकं काय?
सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात रजनीकांत यांच्या घराजवळ पाणी साठल्याचं दिसतं आहे. तसंच घरासमोरचा रस्ताही पाण्याखाली गेला आहे. वादळ आलं त्यावेळी रजनीकांत आणि त्यांचे कुटुंबीय चेन्नईमध्ये नव्हते. त्यांच्या घराचा व्हिडीओ त्यांच्या एका चाहत्याने अपलोड केला आहे. रजनीकांत हे सध्या थलाइवर १७० या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहेत. याच सिनेमाच्या चित्रीकरणासाठी ते बाहेर होते.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानदेखील चेन्नईच्या पुरात अडकला होता. अभिनेता विष्णू विशाल याने चेन्नई अग्निशमन दलाने केलेल्या त्याच्या बचावाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्या फोटोमध्ये आमिर खानला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
राजनाथ सिंह काय म्हणाले?
चेन्नई आणि आसपासच्या वादळग्रस्त भागांची हवाई पाहणी केल्यानंतर आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याशी सचिवालयात उच्चस्तरीय बैठक घेतल्यानंतर राजनाथ म्हणाले,‘‘तमिळनाडूत वादळी पाऊस आणि पूर यांमुळे झालेल्या प्राणहानीबद्दल पंतप्रधान मोदी यांना तीव्र दु:ख झाले असून मदतीचा पहिला ४५० कोटींचा हप्ता तमिळनाडूला आधीच देण्यात आला आहे. तर ४५० कोटी रुपयांचा दुसरा हप्ता देण्याचे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत.’’ मिचौंग वादळाचा तडाखा बसल्याने मोठी हानी झालेल्या तमिळनाडूने केंद्राकडे पाच हजार ६० कोटींची मदत मागितली होती.चेन्नईसह अन्य काही जिल्ह्यांतील काही भाग अद्याप पाण्याखाली आहेत. चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपेट या जिल्ह्यांमध्ये मदतकार्य वेगाने सुरू आहे.