लेखक, वाचक आणि कथा या एकाच त्रिकोणाच्या तीन वेगवेगळ्या बाजू असल्या तरी सहसा पुस्तक हेच त्या त्रिकोणाचं नाव असतं. तरुणाई आणि पुस्तक हे समीकरण अनेकांसाठी विचार करण्यापलीकडले असले तरीही ‘स्टेटस अपडेट’ करण्यासोबतच वाचन करणं हा तरुणाईचा एक आवडता छंद आहे हे नाकारता येणार नाही. तरुण पिढीमध्ये काही गाजलेल्या लेखकांपैकी एक म्हणजे चेतन भगत. वेगळ्या धाटणीचे लेखन करण्यासाठी ओळखला जाणारा लेखक चेतन भगत सध्या त्याच्या नव्या पुस्तकामुळे चर्चेत आला आहे. एका मुलीच्या दृष्टाकोनातून चक्क मुलीच्याच पात्राला चेतनने त्याच्या या पुस्तकात साकारले आहे.
‘वन इंडियन गर्ल’ या पुस्तकात चेतन भगतने आधुनिक भारतातील एका स्वावलंबी तरुणीच्या जीवनावर आधारित कथेचे चित्रण केले आहे. नुकतेच चेतन भगतने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केलेल्या काही व्हिडिओंमध्ये त्याने हे पुस्तक लिहिण्यासाठी आणि मुलींना समजून घेण्यासाठी केलेला खटाटोप वाचकांसमोर मांडला आहे. मुलींचे इतकं बारकाइने निरीक्षण करणाऱ्या चेतनला त्याच्या या शोधमोहिमेतून अनेक गोष्टी उलगडल्या आहेत असेच दिसतेय.
दरम्यान, बॉलिवूडमध्येही चेतनच्या पुस्तकांची दखल घेतली जाते. ‘काय पो चे’ या चित्रपटानंतर चेतनच्याच ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ या पुस्तकार आधारित चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.