सध्या मराठीत एकापोठापाठ एक ऐतिहासिक चित्रपटांची घोषणा होत आहे. तसेच अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचा ऐतिहासिक चित्रपटांकडे पाहण्याचा ओढा देखील वाढला आहे. त्यातच आता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे नवा ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. ‘गरुडझेप’ असं या चित्रपटाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. यानंतर आता अमोल कोल्हेंच्या या ऐतिहासिक चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. याचा टीझरही समोर आला आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘शिवप्रताप- गरुडझेप’ या चित्रपटाचा आणखी एक टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये अमोल कोल्हेंचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवतारातील लूक पाहायला मिळत आहे. या चित्रपटात रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करण्यात येणार आहे. यात डॉ अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे.
‘केबीसी’च्या प्रत्येक भागासाठी बिग बी घेतात इतकं मानधन? कपड्यांवरही होतो लाखोंचा खर्च
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा ‘शिवप्रताप’ मालिकेतील ‘गरुडझेप’ या चित्रपटाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आता या चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा नवा टीझर शेअर करताना अमोल कोल्हे म्हणाले, विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर, मराठी मातीचा संस्कार, चित्रपटगृहांत अनुभवा, आग्राभेटीचा थरार! शिवप्रताप गरुडझेप – ५ ऑक्टोबर २०२२. येत्या विजयादशमीच्या मुहूर्तावर म्हणजे ५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. हा टीझरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जगदंब क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्वतः अमोल कोल्हे यांनीच केली आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.