लहान मुलांच्या वाहिन्यांपुरती मर्यादित असलेल्या अॅनिमेशन मालिकोंना ‘कलर्स’ वाहिनीवरील पहिल्यावहिल्या ‘छोटी आनंदी’ या मालिकेच्या निमित्ताने ‘जनरल एंटरटेन्मेंट चॅनेल्स’च्या (जीईसी) विश्वात प्रवेश मिळाला आहे. मात्र या वाहिन्यांवरचे प्रेक्षक अॅनिमेशन मालिका स्वीकारतील का, असा प्रश्न अॅनिमेशन उद्योगजगतासमोर आहे. ‘छोटी आनंदी’ या अॅनिमेशन मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली तर अॅनिमेशन उद्योगाला ‘जीईसी’चा खूप मोठा पर्याय उपलब्ध होईल, असे मत या मालिकेच्या अॅनिमेशनतज्ज्ञांनी व्यक्त केले.
‘कलर्स’ वाहिनीवरील ‘बालिकावधू’ या गाजलेल्या आणि दीर्घकाळ चाललेल्या मालिका. या मालिके ची लोकप्रियता लक्षात घेऊन त्याचा विस्तार करण्याच्या दृष्टीने अॅनिमेशनचा विचार वाहिनीकडून सुरू झाला खरा..अजूनही आपल्याकडे अॅनिमेशन हे लहान मुलांपुरतीच मर्यादित असल्याने इथेही आनंदीच्या बालपणावरच लक्ष केंद्रित क रायचा निर्णय घेतला गेल्याची माहिती ही अॅनिमेटेड मालिका तयार करणाऱ्या ‘हॉपमोशन स्टुडिओ’चे संस्थापक अनीश पटेल यांनी दिली. अॅनिमेशन आपल्याकडे अजूनही तितक्या प्रमाणात केले जात नाही. लहान मुलांच्या वाहिनीवरील काही निवडक शो सोडले तर बरेचसे शोज हे आंतरराष्ट्रीय स्टुडिओजचे शो आहेत. त्यामुळे ‘हॉपमोशन’कडेही सध्या अशा आंतरराष्ट्रीय शोजच्या अॅनिमेशनचेच काम प्रामुख्याने केले जाते, असे त्यांनी सांगितले.
अॅनिमेशन मालिकांसाठीही अजून हा उद्योग लहान मुलांच्या वाहिन्यांवरच अवलंबून आहे. त्या वाहिन्यांचे मूळही आंतरराष्ट्रीय असल्याने देशी मालिकांच्या निर्मितीत फारशी वाढ झालेली नाही. अशा वातावरणात ‘जीईसी’चेही व्यासपीठ उपलब्ध झाले तर नवे पर्याय खुले होऊ शकतील, अशी आशा पटेल यांनी व्यक्त केली. ‘छोटी आनंदी’ करतानाही ‘जीईसी’चा कल हा नायिकाप्रधान मालिकांचा असतो हे लक्षात घेऊन इथेही आनंदीची व्यक्तिरेखा मध्यवर्ती आहे. तिच्या लहानपणीचा काळ या मालिकेत असेल मात्र इथे मूळ मालिकेप्रमाणे आनंदीच्या आयुष्यात ज्या पद्धतीने घटना घडल्या. त्याचे हुबेहूब चित्रण नाही. आनंदी या गाजलेल्या व्यक्तिरेखेला घेऊन छोटय़ा-छोटय़ा कथा गुंफण्यात आल्या आहेत. ‘जीईसी’ वाहिन्या या सर्वसमावेशक असल्याने तिथे अॅनिमेशन मालिकांची संख्या एकदम वाढवता येणार नाही, मात्र प्रेक्षकांना डेली सोपचा हा ‘अॅनिमेटेड’ अवतार पसंत पडला तर या मालिकांचा प्रेक्षकवर्गही वाढेल. त्यामुळे ‘छोटी आनंदी’ मिळणाऱ्या प्रतिसादावर पुढची वाटचाल ठरेल, अशा शब्दांत अनीश पटेल यांनी ‘जीईसी’वर दाखल झालेल्या या पहिल्या अॅनिमेशन मालिकेचे महत्त्व विशद केले.

Story img Loader