गेल्या काही काळापासून ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण चित्रपटांची लाट आली आहे. त्यातच थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट ‘फुले’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात प्रतीक गांधी ज्योतिबा फुलेंची भूमिका साकारत आहेत, तर अभिनेत्री पत्रलेखा सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात लहान सावित्रीबाईंची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे बालकलाकार राधा धारणे हिला.चित्रपटाविषयी तिच्याशी संवाद साधला असता, तिने या भूमिकेच्या प्रवासाविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
भूमिकेविषयी राधा नेमकं काय म्हणाली?
“माझ्यासाठी ही खूप मोठी संधी होती. जेव्हा मला या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी सहयोगी निर्माता रोहन गोडांबे ह्यांनी बोलावलं, तेव्हा मी खूप उत्सुक होते. दिग्दर्शक अनंत महादेवन सरांनी मला काही संवाद वाचायला दिले आणि माझ्या प्रतिक्रिया विचारल्या. काही दिवसांनी जेव्हा मला कळलं की, मी लहान सावित्रीबाईंच्या भूमिकेसाठी निवडली गेले आहे, तेव्हा माझा आनंद गगनात मावेना!”
मी पहिल्यांदा नऊवारी नेसले-राधा धरणे
राधाने या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली. त्या काळातील बोली, वेशभूषा आणि हावभाव यावर बारकाईने लक्ष दिलं. “मी पहिल्यांदाच नऊवारी साडी नेसली. त्यात चालणं, बोलणं वेगळंच वाटायचं. शिवाय त्या काळातील भाषा थोडी वेगळी होती, त्यामुळे त्यावरही मी विशेष मेहनत घेतली,” असं ती सांगते. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या आठवणी सांगताना ती म्हणते, “एक सीन असा होता, जिथे मला एका खडतर वाटेवरून, शेतातून चालत जाऊन ज्योतिबा यांना जेवण द्यायचं होतं. तो प्रसंग खूप भावनिक होता आणि मला तो फार आवडला.”
शाळेच्या शिक्षकांचा मला पाठिंबा मिळाला-राधा धरणे
मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव खूप समृद्ध करणारा असल्याचं तिने सांगितलं. “ते नेहमी मार्गदर्शन करायचे, संवाद नीट कसे म्हणायचे, भाव कसे आणायचे हे मला सहकलाकारांकडून शिकायला मिळालं.” राधा सध्या सहावीत शिकत आहे आणि शाळेच्या अभ्यासासोबत अभिनय कसा सांभाळते याबद्दल ती सांगते, “शाळेच्या शिक्षकांचा मला खूप पाठिंबा आहे. चित्रीकरणादरम्यान वेळ मिळेल तसा मी अभ्यास पूर्ण करते. अभिनय आणि शिक्षण दोन्ही सांभाळायला मला आवडतं.”
‘फुले’ चित्रपटाचा सामाजिक संदेश
या चित्रपटातून सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या समाजकार्याची जाणीव नव्या पिढीला होणार आहे. राधासह संपूर्ण टीमसाठी हा चित्रपट केवळ अभिनयापुरता नाही, तर एक प्रेरणादायी प्रवास ठरला आहे. ‘फुले’ हा चित्रपट ११ एप्रिल २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, तो समाजासाठी एक महत्त्वाचा संदेश घेऊन येत आहे.