बांगलादेश निर्मिती झाली १९७१ ला त्या वेळी झालेल्या हिंसाचाराच्या अनेक कथा पुस्तकांमधून, लोकांच्या बोलण्यातून सतत समोर येत असतात. त्या वेळचे पूर्व पाकिस्तान आणि आताच्या बांगलादेश निर्मितीमागील वास्तव पडद्यावर आणण्याचा प्रयत्न मृत्युंजय देवव्रत दिग्दíशत ‘चिल्ड्रेन ऑफ वॉर’मध्ये करण्यात आला आहे. सौम्या देवव्रत निर्मित या चित्रपटाचे प्रदर्शन चित्रपटाच्या ‘बास्टर्ड चाइल्ड’ या मूळ नावाने झालेल्या गदारोळामुळे लांबले होते.
दिग्दर्शक मृत्युंजय देवव्रत यांचा हा पहिला चित्रपट असून यातून त्यांनी मुख्यत्वे बांगलादेश निर्मितीच्या वेळी महिलांवर झालेले अमानुष अत्याचार जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वेळी अशी एकही व्यक्ती नव्हती ज्याची अत्याचारातून सुटका झाली असेल. धर्माध झालेल्या लोकांनी आपल्याच धर्मातील महिला, मुले-माणसे कोणावरही अत्याचार करताना मागेपुढे पाहिले नव्हते. धर्माच्या विचारांनी आंधळ्या झालेल्या माणसांना कसलाच विधिनिषेध उरला नव्हता. त्यातूनच जे घडले ते भीषण वास्तव जगापुढे आणण्याचा प्रयत्न ‘चिल्ड्रन ऑफ वॉर’ या आपल्या चित्रपटातून करण्यात आला असल्याचे देवव्रत यांनी सांगितले.
‘चित्रपटाचा विषय जरी त्या काळी महिलांवर झालेल्या अत्याचारांचा असला तरी यातून फक्त महिलांवर झालेले बलात्कारासारखे पाशवी अत्याचार समोर आणणे एवढा संकुचित विचार आम्ही केला नव्हता. उलट, एवढे अत्याचार सहन केल्यावरसुद्धा त्या पीडित महिलांनी एकत्रित येऊन परिस्थितीविरुद्ध झुंज दिली ते या चित्रपटातून जगाला दाखवून द्यायचे आहे,’ असे मत अभिनेता प्रवण मल्होत्रा यांनी व्यक्त केले. ‘भाग मिल्खा भाग’मधील गाजलेल्या भूमिके नंतर प्रवण मल्होत्रा या चित्रपटात एका पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या भूमिकेतून आपल्यासमोर येणार असून, त्यांच्या या भूमिकेला खलनायकी छटा आहे. त्यांच्यासोबत रायमा सेन, इंद्रायणी सेनगुप्ता, व्हिक्टर बॅनर्जी, तिलोत्तमा शोमे यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असून दिवंगत अभिनेता फारुख शेखही यांनीही या चित्रपटात काम केले आहे.
 या चित्रपटात पीडित महिलेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री तिलोत्मा शोमे हिच्या म्हणण्यानुसार, ‘त्या काळच्या महिलांच्या धाडसीपणाला खरेच दाद दिली पाहिजे. इतके अत्याचार सहन करूनही त्यांनी लढण्याची जिद्द सोडली नाही. त्यांना आपल्या स्वातंत्र्यासाठी लढायचे होते. आणि त्या एकजुटीने त्यासाठी लढल्या. ही जिद्द दाखवणे कदाचित आजच्या काळातही कोणाला सहज शक्य नाही.’

Story img Loader