हिंदी चित्रपटसृष्टी ही दर्जेदार कथानकांसोबत चित्रपटांतील संगीतासाठीही ओळखली जाते. अगदी कृष्णधवल चित्रपटांपासून ते आतापर्यंतच्या कलाकृतींमध्ये चित्रपट संगीताने तितकीच महत्त्वाची भूमिका बजावल्याचं पाहायला मिळालं. ज्यामध्ये काही अजरामर गाण्यांनी खऱ्या अर्थाने जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. एखाद्या पात्राला प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवून देण्यास मदत केली. अशा यादीतील एक गाणं म्हणजे ‘आवारा हूँ’.

‘शो मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज कपूर यांच्या अद्वितीय कलाकृतींमधील हा एक नजराणाच जणू. १९५१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आवारा’ या चित्रपटातील ‘आवारा हूँ’ या गाण्याने फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातही राज कपूर यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्यांची ही लोकप्रियता आणि प्रेक्षकांच्या मनात असणारं स्थान आजही कायम आहे, याचा प्रत्यय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ पाहून येत आहे.

पाहा : शब्दसुमनांचा ‘पार्टनर’

अनंत कृष्णन यांनी ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये एक चीनी व्यक्ती मुकेश यांनी गायलेलं ‘आवारा हूँ’ हे गाणं गुणगुणताना दिसत आहे. गाण्याचे बोल मागेपुढे होत असले तरीही ज्या अंदाजात त्या व्यक्तीने हे गाणं सादर केलं आहे, ते पाहता खऱ्या अर्थाने हा ‘आवारा’ प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतोय, असं म्हणायला हरकत नाहीये. अवघ्या काही मिनिटांचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा ‘शो मॅन’ची आठवण करुन देतोय. काय म्हणता तुम्हालाही हे गाणं ऐकावसं वाटतंय? वाट कसली पाहताय, निश्चिंत होत पुन्हा रममाण व्हा ‘आवारा’च्या दुनियेत…

Story img Loader