चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंतेचं वातावरण आहे. चीनमध्ये करोना व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंट BF7 ने हाहाकार माजवला आहे. या व्हेरिएंटचे रूग्ण चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. अचानक रुग्णसंख्या वाढल्याने चीनमधील आरोग्यव्यवस्था कोलमडली आहे. तीन वर्षांपूर्वीसारखी परिस्थिती चीनमध्ये पुन्हा एकदा उद्भवली आहे, त्यामुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे. करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना चीनच्या एका गायिकेने केलेल्या कृत्याबद्दल लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
प्रसिद्ध चिनी गायिका आणि गीतकार जेन झांग हिने स्वतःला करोनाची लागण करून घेतली आहे. काही मित्रांना करोनाची लागण झाल्यामुळे आपणही स्वतःहून करोनाची लागण करून घेतली असल्याची कबुली तिने सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर तिच्याबद्दल लोकांनी संताप व्यक्त केला आहे. चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना गायिकेने असं कृत्य केल्यामुळे लोक नाराजी व्यक्त करत आहेत. तिने करोनाचे वाहक असलेल्या लोकांची भेट घेतली आणि स्वतःला लागण करून घेतली, अशी माहिती साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिली आहे.
गायिका जेन झांगने स्वत: सोशल मीडियावर करोना व्हायरसची लागण होण्याच्या आपल्या प्लॅनबद्दल खुलासा केला. तिने सांगितले की, ती त्या घरात गेली होती, जिथे कोविडची लागण झालेले लोक होते. यानंतर तिला डोकेदुखी, ताप आणि घसादुखी ही कोरोनाची सामान्य लक्षणं जाणवत होती, परंतु ती एका दिवसात बरी झाली. लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी तिच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर तिने सोशल मीडियावरून वादग्रस्त पोस्ट हटवली आणि लोकांची माफीही मागितली.
जेन झांगने सांगितलं की ती नवीन वर्षासाठी म्युझिक इव्हेंटची तयारी करत आहे. तिला करोना विषाणूची लागण करून घ्यायची होती, जेणेकरून डिसेंबरच्या अखेरीस म्युझिक इव्हेंटमध्ये तिला कोविड होण्याचा धोका नसेल. दरम्यान, तिने केलेलं हे कृत्य तिच्या चाहत्यांनाही रुचल्याचं दिसत नाहीये, त्यानी जेनवर सडकून टीका केली आहे. तसेच देशातील परिस्थिती गंभीर असताना एक लोकप्रिय गायिका असं कृत्य कसं करू शकतो, असंही अनेकांनी म्हटलंय.