दाक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवी सध्या एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. ‘ब्रह्म आनंदम’ चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटला त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी नातू व्हावा अशी इच्छा चिरंजीवी यांनी व्यक्त केली. तसेच राम चरणला पुन्हा मुलगी होईल याची भीती आहे असंही चिरंजीवी यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे.
मेगास्टार चिरंजीवी यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर लिंगभेद म्हणजेच मुलं आणि मुलींमध्ये भेदभाव करण्याचा आरोप केला जात आहे. “घरी असतो तेव्हा लेडीज हॉस्टेलसारखं वाटतं कारण, आमचं घर माझ्या नातींनी भरलेलं असतं” असंही यावेळी चिरंजीवी म्हणाले आहेत. याचं कारण म्हणजे चिरंजीवी यांना श्रीजा आणि सुष्मिता अशा दोन मुली आहेत आणि त्यांच्या दोन्ही मुलींना दोन मुली आहेत. तर, राम चरण आणि उपासनाला लग्नानंतर १२ वर्षांनी कन्यारत्न प्राप्ती झाली. राम चरणच्या लेकीचं नाव क्लिन कारा कोनिडेला असं आहे.
‘ब्रह्म आनंदम’ कार्यक्रमात चिरंजीवी म्हणाले, “जेव्हा मी घरी असतो, तेव्हा मला असं वाटतं की, मी महिला हॉस्टेलचा वॉर्डन आहे, मी नातींच्या गोतावळ्यात असतो. मला रामचरणकडून हेच हवंय की किमान त्याला तरी मुलगा व्हावा. जेणेकरून आमचा वारसा पुढे जाईल, पण तो त्याच्या मुलीचे खूप लाड करतो. त्याच्यासाठी ती जीव की प्राण आहे. मला भीती वाटते की, त्याला पुन्हा मुलगीच होईल.”
चिरंजीवींच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक एक्स युजर हा व्हिडिओ शेअर करत लिहिते, “चिरंजीवी यांना भीती आहे की त्यांचा मुलगा राम चरणला दुसरी मुलगी होऊ शकते. २०२५ मध्ये, पुरुष वारसा पुढे न्यावा याबद्दल असा विचार करत आहेत हे खरंच निराशाजनक आहे. पण आश्चर्यकारक नाही.” तर, दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “चिरंजीवी यांचे हे शब्द ऐकून खूप वाईट वाटलं. मुलगी असेल तर का घाबरायचं? ती मुलांप्रमाणेच किंवा त्याहूनही चांगल्याप्रकारे यांचा वारसा पुढे नेऊ शकते. अशा गोष्टी चुकीचा संदेश देतात”
दरम्यान, मेगास्टार चिरंजीवी यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ते लवकरच ‘विश्वंभरा’ या सिनेमात झळकणार आहेत.