aniruddha.bhatkhande@expressindia.com
सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा ब्रह्मांडात प्रथम ओंकाराचा स्वर घुमला आणि नंतर सात सूरांची निर्मिती झाली, असे मानतात. या सप्तसुरांनी अनादी काळापासून तुमचे-आमचे भावविश्व व्यापून टाकले. लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपटसंगीत असे विविध संगीतप्रकार या सात सुरांमुळे उदयास आले. या प्रत्येक प्रकाराची गरज आणि ते ऐकणाऱ्यांची अभिरुची भिन्न असल्याने सूरांचे अगणित अविष्कार घडले. मात्र सप्तसुरांचे विशुद्ध रुप ऐकले तर अन्य संगीतप्रकारांचा विसर पडतो. ‘टाइम्स म्युझिक’ या कंपनीची प्रस्तुती असलेली ‘सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती’ ही सीडी ऐकताना ही अनुभूती मिळते.
हिंदू धर्माचे पुनरुत्थान करणारे आदी शंकराचार्य यांनी आदिमाया शक्तीची महती विषद करण्यासाठी रचलेले ‘श्री सौंदर्य लहरी’ हे श्लोक प्रसिद्ध आहेत. या सीडीसाठी या संस्कृत श्लोकांची निवड करण्यात आली असून अनुराधा पौडवाल यांच्या गोड आवाजात हे श्लोक ऐकण्यास मिळतात. यातील ‘शक्ती प्रेअर’ हा २४ मिनीटांचा पहिला भाग सुरू होताच तंबोरा, स्वरमंडल आणि बासरी यांच्या साथीने अनुराधा पौडवाल यांचा खर्जातील स्वर ऐकू येतो आणि मन नकळत एकाग्र होते. ‘रिपल्स ऑफ ब्यूटी’ हा २८ मिनीटांचा दुसरा भागही तितकाच श्रवणीय आहे. यामध्ये भूप रागाचा वापर करण्यात आला असून लता मंगेशकर यांच्या ‘शिवकल्याण राजा’ या गाजलेल्या ध्वनिफितीतील ‘निश्चयाचा महामेरु’ या शिवस्तुतीची यावेळी आठवण होते. चित्रपटसंगीताचे एक पर्व गाजवल्यानंतर अनुराधा पौडवाल एकाएकी गायबच झाल्या. (त्यामुळे अनेक बेसूऱ्या गायिकांचे फावले) त्या अद्यापही पूर्वीच्या तुलनेत चित्रपटगीते गाताना दिसत नाहीत. आध्यात्मिक संगीतरचना गाण्याकडे त्यांचा कल वाढलेला दिसतो. ही सीडी त्यांच्या या नव्या संगीतप्रवासातील मैलाचा दगड ठरावी अशीच आहे. त्यांचा गोड, शुद्ध व सात्विक स्वर, रोणू मुजुमदार यांचे बासरीवादन ही या सीडीची वैशिष्टय़े आहेतच, मात्र संस्कृत भाषा किती पवित्र, गेयतापूर्ण आणि कर्णमधुर आहे, याचाही यानिमित्ताने प्रत्यय येतो. इंग्लिश बोलता न येणे व इंग्लिशमधून संवाद साधता न येणे हा आपल्याकडे फार मोठा अपराध मानला जातो, अनेकांना याबाबत न्यूनगंडही असतो. संस्कृत येत नसल्याची मात्र आपल्याला खंत वाटत नाही. संस्कृतचे महत्त्व पाश्चिमात्यांना मात्र उमगले आहे.
या सीडीतील श्लोक कोणी स्वरबद्ध केले आहेत, हे पाहिले तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला. क्रेग प्रुएस या ब्रिटीश संगीतकाराने ही कामगिरी केली आहे! अनेक वाद्यांवर प्रभूत्व असणारे प्रुएस १९८०पासून वैदिक शास्त्र, ध्यानधारणा आणि भारतीय शास्त्रीय संगीत याचा अभ्यास करत आहेत. त्यांनी संस्कृत भाषाही आत्मसात केली असणार, हे ओघाने आलंच. यामुळेच त्यांनी शंकराचार्याच्या श्लोकांना सहजपणे संगीतबद्ध केलं आहे. ब्रह्मानंदी टाळी लागणं म्हणजे काय, याचा अनुभव ही सीडी ऐकताना येतो. केवळ आस्तिकांनाच नाही तर नास्तिकांना (आणि अहिंदूंनाही) ही आध्यात्मिक अनुभूती येईल, यात शंका नाही. सृष्टीनिर्मितीच्या वेळी नेमकं काय घडलं, याचा शोध घेण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांचे संशोधन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ‘हिग्ज बोसन’ अर्थात ‘देवकणा’चा शोधही लागला म्हणे. तो सारा खटाटोप शास्त्रज्ञांनी करावा, कानसेनांनी ही सीडी ऐकून सप्तसूरांच्या दिव्यत्त्वाची प्रचिती घ्यावी.
डेस्टिनी चक्र
राजाभाऊ पोहनकर व डॉ. सुशीला पोहनकर यांच्यासारख्या संगीततज्ज्ञ आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेली व जबलपूरसाख्या छोटय़ा परंतु उत्तम सांस्कृतिक वातावरण लाभलेल्या शहरात लहानाची मोठी झालेली स्वाती नाटेकर धनक, अंजुमन आणि सूरमोही यासारख्या गजलच्या अल्बममधून यापूर्वीच नावारुपाला आली आहे. आघाडीची शास्त्रीय गायिका अशी तिची प्रमुख ओळख असून ती सध्या लंडनमध्ये स्थिरावली आहे. अनेक नामांकित कलाकारांसोबत तिने युरोप, वेस्ट-इंडिज, द. आफ्रिका, पाकिस्तान आदी ठिकाणी जाहीर कार्यक्रम केले आहेत. जबलपूरपासून लंडनपर्यंतच्या या सांगीतिक प्रवासासाच तिने ‘डेस्टिनी चक्र’ या नव्या अल्बमसाठी थीम म्हणून उपयोग केला आहे.
‘टाइम्स म्युझिक’ या कंपनीची प्रस्तुती असलेल्या या अल्बममध्ये मात्र तिच्या गायकीचा वेगळा अविष्कार अनुभवण्यास मिळतो. यात एकूण १२ ट्रॅक आहेत. गाण्यांऐवजी ट्रॅक हा शब्द वापरण्याचे कारण म्हणजे त्यांचे वेगळेपण. चित्रपटांमुळे आपल्याला शब्दबंबाळ गाणी ऐकण्याची सवय झाली आहे.
या प्रकारात मात्र त्यास पूर्ण फाटा देण्यात आला आहे. श्री, नैना तोसे, रसके भरे, बाबूल, मिस्टरी, संदेसा, डिव्हाइन कर्मा (२ ट्रॅक), साँवरिया, सिम्पल थिंग्ज, सोनिये आणि मंत्रा अशा १२ ट्रॅकमधील गीते केवळ २-४ ओळींची आहेत! उदाहरण द्यायचे तर ‘नैना तोसे’ या ट्रॅकमध्ये ‘नैना तोसे लागे, सारी रात जागे’ अशी एकच ओळ आहे. तसेच ‘रस के भरे’मध्ये ‘रस के भरे तोरे नैन, आजा साँवरिया तोहे गरवाँ लगा लू’ ही एकच ओळ आहे. यामुळे एवढंच काय ऐकायचं, असा प्रश्न पडू शकतो, मात्र त्यातच ग्यानबाची मेख आहे. हे सर्व ट्रॅक म्हणजे हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य आधुनिक संगीत यांचं अनोखं फ्यूजन आहे. हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत, समकालीन संगीत, ठूमरी, पाश्चिमात्य शास्त्रीय संगीत, हिंदूस्थानी व पाश्चात्य तालवाद्ये यांचा आगळावेगळा मिलाप यामध्ये घडला आहे. स्वातीच्या गोड, दाणेदार, आलापी स्वरांना ड्रम, इलेक्ट्रिक व बास गिटार, क्लासिकल की बोर्ड, व्हायलीन, पियानो आदी पाश्चात्य वाद्यांनी काय साथ दिली आहे ते ऐकण्यासारखंच! हे कमी पडेल म्हणून तबला (सत्यजित तळवलकर), सारंगी (दिलशाद खान), सतार (भूपाल पणशीकर) बासरी ही आपली वाद्यं आहेतच.
यातील आठ गाण्यांचं प्रोग्रॅमिंग (म्हणजे संगीतरचना, संगीत संयोजन वगैरे) स्वातीचा पुतण्या अभिजीत पोहनकर याने केलं आहे. उर्वरित प्रोग्रॅमिंग गौरव वासवानी, संचिता फारुक आणि एरिक अॅपेपॉले यांनी केलं आहे. चित्रपटगीतांना आपल्याला खूप आनंद दिला आहेच, वेगळ्या पठडीतील हे फ्यूजन या आनंदात भरच टाकतं!
(समीक्षणासाठी सीडी-डिव्हीडी आमच्या नरिमन पॉईंट अथवा महापे कार्यालयात पाठवाव्यात.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा