आधुनिक पिढीच्या या जगात ना कोणती सिमरन राजसाठी धावत जाते, ना कोणी वीर झारासाठी वाट बघत बसतो. प्रेम, वासना आणि प्रेमभंग सगळं काही क्षणार्धात घडत असताना प्रेमातल्या जुन्या पद्धतीच्या क्लृप्त्या, लव्ह गुरू यापासून फारकत घेण्याची वेळही आलेली आहे. आता प्रेक्षकांना काहीतरी मजेशीर, वास्तववादी आणि त्यांच्या आयुष्याशी जोडून घेता येईल असं काहीतरी खरंच हवं आहे. हेच ओळखून एमटीव्ही बीट्स सध्या भारतीयांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या दर्शन रावलच्या गाण्यांची मेजवानी आणली आहे. दर्शन रावल यात तुमचा नवीन लव्ह दोस्त होऊन येणार आहे. तरुणाईची व प्रेमाच्या वेगवेगळ्या भावनांची नस अचूक पकडणाऱ्या तसेच सर्वांची मने जिंकणाऱ्या त्याच्या संगीतासह हा गायक ‘दिल बीट्स’च्या २७ मार्चपासून सुरू होणाऱ्या नवीन अवतारात सर्वांच्या भेटीला येणार आहे.

प्रणयाचं सदाहरित चैतन्य साजरं करण्यासाठी ‘दिल बीट्स विथ दर्शन रावल’ हा एक अनोखा कार्यक्रम आहे. प्रेमात येणाऱ्या अडचणी आणि त्या कशा हाताळाव्यात याबद्दल हा कार्यक्रम खूप काही सांगणार आहे. आधुनिक युगातल्या ७ प्रेमकथांच्या माध्यमातून दर्शन तुमचा खास असा लव्ह दोस्त होऊन हृदयाच्या या नाजूक गाठींबद्दल टिप्स देईल. हे करताना तो उपदेशाच्या फार फंद्यात न पडता मित्राच्या भूमिकेत सल्ला देईल. प्रेमात पडलेल्या तरुणांना उपयोगी पडतील असे प्रेमाचे धडे तर दर्शन देईलच, शिवाय तो त्यांना येत असलेल्या अडचणी, प्रेमभंगाचं दु:ख हे सगळं जिव्हाळ्याने ऐकूनही घेईल.

अर्थात आपण प्रेमाबद्दल बोलत असताना त्यात सुरेल संगीत शिरकाव करणार नाही असं शक्य आहे का? प्रेक्षकांच्या हृदयात शिरण्याच्या प्रवासात दर्शन ‘दिल बीट्स’मध्ये १४ ओरिजिनल कव्हर्सही सादर करणार आहे. यातलं प्रत्येक गाणं प्रेम आणि नातेसंबंधांच्या विविध अंगाबद्दल काहीतरी सांगणारं आहे. याशिवाय तुमच्या लव्ह दोस्ताने केवळ दिल बीट्ससाठी स्वत: लिहिलेलं, स्वरबद्ध केलेलं आणि गायलेलं ‘काश ऐसा होता’ हे गाणं बघायला विसरू नका.

लव्ह दोस्त ही नवीनच भूमिका साकारण्याबद्दल दर्शन रावल म्हणाला, “प्रेम आणि संगीत हे दोन्ही एकमेकांच्या साथीने खुलतं आणि म्हणूनच लव्ह दोस्त होणं हा मला माझ्या व्यक्तिमत्वाचा नैसर्गिक विस्तार वाटतो. एमटीव्ही बीट्समधून टीव्हीवर पदार्पण करण्याबद्दल मी उत्‍साहित झालो आहे, कारण, यात मी एका पूर्णपणे नवीन अवतारात सर्वांसमोर येतो आहे. आपल्या सर्वांकडे सांगण्यासारखी एक प्रेमकथा असते आणि माझ्या हृदयाच्या सगळ्यात जवळ असलेल्या एका गोष्टीचा भाग होण्याची संधी ‘दिल बीट्स’ मला देणार आहे. प्रेक्षकांनाही माझ्या गाण्यांची काही कधी न ऐकलेली सादरीकरणे या शोच्या माध्यमातून प्रथमच ऐकायला मिळतील.”