बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘खलनायक.’ हा चित्रपट १९९३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते. या चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावरुन तेव्हा वाद झाला होता. नीना गुप्ता, माधुरी दीक्षित यांच्यावर या गाण्यामुळे टीका करण्यात आली होती. आता नीना गुप्ता यांनी त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक ‘सच कहूं तो’मध्ये या गाण्याचा उल्लेख केल्याचे समोर आले आहे. या गाण्याच्या चित्रीकरणावेळी काय घडले होते हे त्यांनी सांगितले आहे.
नीना गुप्ता यांचे पुस्तक अभिनेत्री करीना कपूर खानने नुकताच लाँच केले आहे. या पुस्तकात नीना गुप्ता यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यापासून ते प्रोफेशनल आयुष्यापर्यंत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. दरम्यान ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याचा देखील उल्लेख केला आहे.
आणखी वाचा : प्रेग्नंट नीना गुप्ता यांना सतीश कौशक यांनी केले होते प्रपोज
‘जेव्हा पहिल्यांदाच मी गाणे ऐकले तेव्हा मला ते हिट ठरणार असे जाणावले होते. नंतर सुभाष घई यांनी या गाण्यात माझी भूमिका काय आहे हे सांगितले. ती भूमिका साकारताना मी थोडा विचार करत होते. पण हे गाणे ईला अरुण गात आहे हे ऐकून मला आनंद झाला. तिच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते’ असे नीना म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, ‘गाण्यासाठी मला गुजराती पोशाख करायचा होता. नंतर तो पोशाख घालून मला दिग्दर्शक सुभाष घई यांना दाखवायला सांगितले. ते पाहून सुभाष घई नाही… नाही.. म्हणाले. काही तरी भरा… ते ऐकून मला लाजीरवाणं वाटलं. यामध्ये खासगी काहीच नव्हते.’ नंतर नीना गुप्ता यांना दुसरी अंतरवस्त्रे देण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा लूक पाहून सुभाष घई यांनी योग्य वाटत असल्याचे सांगितले.