Oppenheimer Movie Review : हॉलिवूडचा प्रचंड लोकप्रिय दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन नुकताच एका मुलाखतीमध्ये म्हणाला, “I dont see movies in terms of balance between simplicty and complexity, i think its really about mystery.” आपल्या ह्याच वक्तव्याला दुजोरा देणारा ‘ओपनहायमर’सारखा चित्रपट नोलन आपल्यासाठी घेऊन आला आहे. नोलनचे चित्रपट हे सहसा पहिल्यांदा बघून कळत नाहीत असं सर्वसामान्यांचं म्हणणं असतं पण नुकताच येऊ घातलेला त्याचा ‘ओपनहायमर’ हा चित्रपट त्याच्या इतर चित्रपटांपेक्षा कित्येक पटीने अधिक गुंतागुंतीचा असूनही तुम्हाला तो समजतो, भावतो. अर्थात हे तेव्हाच घडतं जेव्हा तुम्ही घरी काढून ठेवलेलं तुमचं डोकं तुमच्याबरोबर घेऊन चित्रपटगृहात ‘ओपनहायमर’ पाहायला येता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अगदी खरं सांगायचं झालं तर ‘ओपनहायमर’ हा चित्रपट सरसकट सगळ्याच प्रेक्षकांसाठी नाही. नोलनच्या इतर चित्रपटांप्रमाणे यामध्ये तुम्हाला मोठ्या पडद्याला साजेसं असं थ्रिलिंग किंवा आ वासून बघत बसावे असे सीन्स पाहायला मिळणार नाही. अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ज्यांना अणूबॉम्बचे जनक म्हणूनही ओळखलं जातं अशा ज्युलियस रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला असला तरी या माध्यमातून नोलनने अक्षरशः दुसऱ्या महायुद्धापासून ते भविष्यात मानवतेला निर्माण होणारे धोके यावर भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : ‘ओपनहायमर’फेम क्रिस्तोफर नोलन स्मार्टफोन का वापरत नाही? खुद्द दिग्दर्शकानेच सांगितलं कारण

नेहमीप्रमाणेच लोकांच्या डोक्याला प्रचंड खाद्य पुरवणाऱ्या नोलनने ‘ओपनहायमर’ ३ भागांमध्ये आपल्यासमोर मांडला आहे. पहिला भाग म्हणजे ओपनहायमर यांचं शिक्षण, पीएचडी, मॅनहॅटन प्रोजेक्टमधील योगदान, दूसरा भाग म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली अणूचाचणी अन् तिसरा भाग म्हणजे हिरोशिमा आणि नगासाकीवरील अणूबॉम्ब हल्ल्यांनंतर ओपनहायमर यांची अमेरिकन सरकारने केलेली चौकशी. या तीन मुख्य टप्प्यांच्या माध्यमातून नोलनने ही कथा फार हुशारीने मांडली आहे. ‘Non linear story telling’ या खास पद्धतीसाठी प्रसिद्ध असलेल्या नोलनने या चित्रपटातही निव्वळ कमाल केली आहे. जर्मनीत पीएचडी घेतल्यापासून अमेरिकन सरकारच्या चौकशी समितिला सामोरं जाणाऱ्या ओपनहायमर यांचा हा विचित्र अन् तितकाच गूढ असा प्रवास फार प्रभावीपणे पडद्यावर मांडला आहे.

ओपनहायमर यांच्या वैयक्तिक जीवनातील चढ-उतार, क्वांटम फिजिक्समध्ये त्यांचं योगदान, वेद आणि भगवद्गीतेचा त्यांचा अभ्यास तत्कालीन राजकीय परिस्थिती, दुसरं महायुद्ध आणि शीत युद्धादरम्यानचं अमेरिकेतील राजकीय आणि सामाजिक वातावरण, कम्युनिस्ट लोकांशी आलेल्या सबंधांमुळे आलेल्या अडचणी हे सगळं नोलनने फार बारकाईने चित्रपटात मांडलं आहे. कथा आणि पटकथा उत्तम बांधल्याने ३ तास १० मिनिटांचा हा चित्रपट अक्षरशः तुम्हाला खिळवून ठेवतो. याबरोबरच हा चित्रपट अत्यंत शब्दबंबाळ म्हणजेच संवादांनी भरलेला आहे, आणि कदाचित हीच गोष्ट काही लोकांना खटकू शकते. हे सगळे संवाद महत्वाचे, अर्थपूर्ण तर आहेतच पण त्या संवादांमागील पार्श्वभूमी, वैज्ञानिक दृष्टिकोन अन् राजकीय परिस्थिती समजली तर या चित्रपटाचा तुम्ही नक्कीच आस्वाद घेऊ शकता.

कोणत्याही प्रकारच्या कम्प्युटर ग्राफीकचा वापर न करता अणूबॉम्ब चाचणीचा सीन पाहून आपण अवाक होतो. शिवाय त्यानंतर ओपनहायमर यांनी दिलेलं भाषण आणि त्यानंतर त्यांच्या जीवनावर झालेला परिणाम हे सगळं पाहताना आपण सुन्न होतो. याबरोबरच हिरोशिमा नगासाकी हल्ल्यानंतर अमेरिकेने केलेलं सेलिब्रेशन अन् ओपनहायमर यांनी घेतलेली राष्ट्रपती ट्रूमन यांची भेट असे काही प्रसंग नोलनने उत्तमरित्या अधोरेखित करून दाखवलं आहे.

चित्रपटाचं पार्श्वसंगीत हे नेहमीप्रमाणेच उत्कृष्टच आहे, एखादा सीन जसा रंगत जाईल तसं त्यामागील म्युझिक हळूहळू वाढत जाणं आणि गडद होणं ही नोलनची खास स्टाइल यामध्येही तुम्हाला पाहायला मिळते. खासकरून ओपनहायमर यांच्या चौकशीचा शेवटचा भाग पाहून आपल्याही छातीतील धडधड वाढते. अभिनयाच्या बाबतीत तर प्रत्येक कलाकाराने लाजवाब काम केलं आहे. अभिनेत्यांपेक्षा कथेतील पात्रांना अधिक महत्त्व दिल्याने त्यांचं काम आणखी बहरून आलं आहे. सिलियन मर्फी, रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, एमिली ब्लंट, मॅट डॅमन, रामी मलेक या सगळ्यांची कामं चोख झाली आहेत.

आधी सांगितलं त्याप्रमाणे ‘ओपनहायमर’ हा चित्रपट सरसकट सगळ्या प्रेक्षकांसाठी नाही. नोलनचे ‘बॅटमॅन’, ‘इनसेप्शन’सारखे चित्रपट डोळ्यासमोर ठेवून अन् वेगळ्याच अपेक्षा घेऊन हा चित्रपट पाहायला जाणार असाल तर तुमची घोर निराशा होऊ शकते. पण नोलनचे चित्रपट तसेच त्याची शैली ज्यांना आवडते किंवा ज्यांना ३ तास १० मिनिटं डोकं जागेवर ठेवून त्याला खाद्य पुरवणारी एखादी अप्रतिम कलाकृती अनुभवायची असेल तर तुम्ही ‘ओपनहायमर’ आवर्जून बघायलाच हवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Christopher nolan directed oppenheimer movie review in marathi avn
Show comments