आंतरराष्ट्रीय चित्रपट दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या आर बाल्की यांच्या ‘चूप’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. चित्रपटाची कथा एका मनोरुग्णाच्या जीवनावर बेतलेली आहे जी चित्रपट समीक्षकांची निर्घृण हत्या करत सुटला आहे. त्याच्या या हत्यांमुळे समीक्षकांनी समीक्षण करायचं बंद केलं आहे. या एकूण कथानकातून बाल्की यांनी त्यांच्या पद्धतीने चित्रपटसृष्टी आणि त्याभोवतालचं वातावरण यांवर कटाक्ष टाकला आहे.
या चित्रपटाला समीक्षकांनी तसेच प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्याचनिमित्ताने एका मीडिया चॅनलला मुलाखत देताना आर बाल्की यांनी त्यांच्याही मनात एकेकाळी असा विचार आला होता हे स्पष्ट केलं आहे. बाल्की यांचा पहिला चित्रपटाला म्हणजेच ‘चीनी कम’ला समीक्षकांनी हाणून पाडलं तेव्हा त्यांच्या मनाला समीक्षकांचा खून करावा हा विचार चाटून गेला होता. ‘चीनी कम’मध्ये तबू, अमिताभ बच्चन, परेश रावल यांच्या कामाची प्रशंसा झाली पण काही समीक्षकांनी चित्रपटाला आणि दिग्दर्शकाला चांगलंच धारेवर धरलं होतं.
याबाबत बोलताना बाल्की म्हणाले, “त्याकाळी एक प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध समीक्षक होते. त्यांनी माझ्या चित्रपटावर चांगलीच टीका केली होती. माझं लिखाण आणि एकूणच दिग्दर्शन यावर त्यांनी भरपूर तोंडसुख घेतलं होतं. मला हे कळलंच नाही की मी बनवलेल्या इतक्या सकारात्मक चित्रपटाबद्दल कुणी का इतकं नकारात्मक लिहावं. त्यामुळे मी पुरताच खचलो.”
आणखी वाचा : सनी लिओनीच्या घरात काटेकोरपणे पाळला जातो ‘हा’ नियम; कारण वाचून कित्येकांनी केलं सनीचं कौतुक
यानंतर अमिताभ बच्चन यांनी बाल्की यांची समजूत काढली. बच्चन म्हणाले की काही समीक्षक हे एक ठराविक अजेंडा समोर ठेवून समीक्षण लिहितात. त्यावर बाल्की बच्चन यांना म्हणाले, “एखादी गोष्ट आवडली नसेल तर त्याविषयी मत मांडायची एक पद्धत असते, पण यामध्ये थेट माझ्यावरच टीका केली आहे. असं समीक्षण केल्याबद्दल आपण त्याचा खूनच केला पाहिजे.” बाल्की यांचं हे म्हणणं त्या दोघांनी मस्करीमध्ये घेतलं आणि त्याचवेळी बाल्की यांना ‘चूप’ या चित्रपटाची संकल्पना सुचली. या चित्रपटात दुलकर सलमान, सनी देओल, पूजा भट्ट, श्रेया धन्वंतरी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.