प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा ‘ओपनहायमर’ हा चित्रपट २१ जुलै २०२३ रोजी जगभरात प्रदर्शित झाला. अणुबॉम्बचे जनक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ज्युलियस रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अभिनेता किलियन मर्फीने मुख्य भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटातील एका दृष्यामुळे तो भारतात वादात सापडला. चित्रपटात किलियन मर्फी म्हणजेच ओपनहायमर सेक्स सीनदरम्यान भगवद्गीतेचं वाचन करताना दाखवण्यात आलं आहे. यानंतर त्या बोल्ड सीनबद्दल किलियनने प्रतिक्रिया दिली आहे.
‘जीक्यू;ला दिलेल्या मुलाखतीत सिलियन मर्फीला चित्रपटात बोल्ड सीन आवश्यक होते का असं विचारण्यात आलं. मर्फी म्हणाला, “मला वाटतं की ते सीन या चित्रपटात महत्त्वाचे होते. ओपनहायमरचं जीन टॅटलॉकसोबतचं नातं हे या कथेचा एक महत्त्वाचा भावनिक भाग आहे. कोणालाही ते (सेक्स-सीन्स) करणं आवडत नाही, पण ते आमच्या कामाचा भाग आहेत. त्यामुळे काहीवेळा आम्हाला ते करावे लागतात.”
चित्रपटातील सेक्स सीनच्या चर्चेवर दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन म्हणाला, “जेव्हा तुम्ही ओपनहायमरच्या जीवनाकडे पाहता आणि तुम्ही त्याच्या कथेकडे पाहता, तेव्हा त्याच्या जीवनातील पैलू, त्याच्या लैंगिकतेचे पैलू, स्त्रियांसोबतचे त्याचे वागणे या सर्व गोष्टी त्याच्या कथेचा एक आवश्यक भाग आहे, त्यामुळे ते प्रेक्षकांना दाखवणं गरजेचं होतं.”
दिग्दर्शकाला ओपनहायमरच्या आयुष्यात महत्त्वाचे राहिलेले हे नाते पूर्णपणे समजून घ्यायचे होते. पण त्याचवेळी चित्रपटातील या दृश्यावर प्रेक्षक काय प्रतिक्रिया देतील याची त्याला चिंता होतीच. नोलन म्हणाला, “जेव्हाही तुम्ही अशा क्षेत्रात काम करण्याचं आव्हान स्वीकारता ज्यामध्ये तुम्ही यापूर्वी काम केले नाही, तेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार असायला हवे, तसेच नियोजित आणि सावधही असले पाहिजे.”