मुलगी झाली हो (Mulgi Zali Ho) मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी राजकीय भूमिका घेतल्यानं मालिकेतून काढल्याचा आरोप केला. यानंतर त्यांच्यावर महिलांशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोप झाला. मात्र, यावर आता किरण माने यांच्यासोबत काम केलेल्या अनेक महिला सहकलाकारांनी समोर येत भूमिका मांडली. तसेच किरण माने यांच्यासोबत काम करताना त्यांनी कधीही गैरवर्तन केलं नसल्याचं म्हटलं आहे. यात अभिनेत्री अनिता दाते-केळकर, अभिनेत्री प्राजक्त केळकर, अभिनेत्री श्वेता आंबीकर, अभिनेत्री शितल गीते, गौरी सोनार यांचा समावेश आहे.
अभिनेत्री प्राजक्ता केळकर म्हणाल्या, “मी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत कल्याणी म्हणजे आत्याबाई ही भूमिका करते. सध्या किरण माने हा विषय चर्चेत आहे. आम्हाला सतत हा प्रश्न विचारला जातो की किरण माने यांची एक स्त्री म्हणून, एक सहकलाकार म्हणून तुमच्याशी वागणूक कशी होती? मला हे सांगताना काहीही अडचण वाटत नाही की किरण माने हे व्यक्ती म्हणून आणि सहकलाकार म्हणून अतिशय उत्तम माणूस आहे.”
“सव्वा ते दीड वर्षांपासून सोबत काम करते, कोणतंही गैरवर्तन नाही”
“किरण मानेंचं सेटवरील वागणं अतिशय चांगलं आहे. ते हसून खेळून वागतात, आपल्या सहकलाकारांना समजून घेतात. त्यांना चांगल्या गोष्टी समजून सांगणं, सीन समजून देणं या गोष्टी ते सेटवर करतात. मी सव्वा ते दीड वर्षांपासून किरण माने यांच्यासोबत काम करते. एक स्त्री म्हणून आतापर्यंत त्यांनी माझ्याशी कोणतीही गैरवर्तणूक केलेली नाही. ना शब्दातून, ना वागण्यातून. त्यामुळे मला ते एक उत्तम व्यक्ती वाटतात, उत्तम सहकलाकार वाटतात,” असंही प्राजक्ता केळकर यांनी नमूद केलं.
अभिनेत्री श्वेता आंबीकर काय म्हणाली?
अभिनेत्री श्वेता आंबीकर म्हणाली, “मी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत आर्याची भूमिका करते. आत्ता आम्हाला सगळीकडे असा प्रश्न विचारला जातो की किरण माने यांची तुमच्यासोबत वर्तणूक कशी आहे? ते कसे वागतात? मी हेच सांगेल की ते माणूस म्हणून खूप चांगले आहे. ते सहकलाकार म्हणून ते खूप उत्तम आहेत. खूप चांगले वागतात. मी पहिल्या दिवसापासून त्यांच्यासोबत काम करते आहे.”
“आजपर्यंत दीड वर्षात मी त्यांना माझ्यासमोर कधीही शिवी देताना ऐकलेलं नाही”
“आजपर्यंत दीड वर्षात मी त्यांना माझ्यासमोर कधीही शिवी देताना ऐकलेलं नाही. त्यांनी कधीही अपशब्द वापरले नाहीत. किरण माने खरंच आम्हाला सेटवर मुलींसारखं वागवतात. त्यामुळे त्यांची सेटवर एक वडिलांसारखी प्रतिमा आहे,” असंही श्वेता आंबीकर यांनी नमूद केलं.
अभिनेत्री शितल गिते काय म्हणाली?
शितल गिते म्हणाली, मी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत अक्षराची भूमिका करते. सध्या चर्चेत असलेल्या किरण माने सरांच्या गैरवर्तणुकीच्या विषयावर बोलायचं आहे. ते सेटवर अतिशय चांगले वागतात. मी मालिकेत त्यांची मोठी मुलगी अक्षराची भूमिका करते. त्यामुळे मी त्यांना सातत्याने बाबा म्हणत आले आहे. वडिलांचा आदर कुणी कुणाला सहजासहजी देत नाही. त्यांची वागणूक माझ्याप्रती वाईट असती, तर मी त्यांना हा आदर दिला नसता.”
मला इतकंच सांगायचं आहे की किरण माने यांनी आतापर्यंत ना माझ्यासमोर अपशब्द वापरले आहेत, ना कधी मला टोमणे वगैरे मारलेत किंवा माझ्यासोबत वाईट वर्तणुकही अजिबात केलेली नाही. मला त्यांच्याकडून अभिनयाबद्दल अभिनयाबद्दल खूप काही शिकायला मिळालं. मला आशा आहे इथून पुढे देखील त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल,” असंही शितल गिते हिने नमूद केलं.
अभिनेत्री गौरी सोनार काय म्हणाली?
किरण माने यांची प्रतिक्रिया
“एकीकडे काही कलाकार आरोप करत आहेत. तर दुसरीकडे काहीजण मला सपोर्ट करताना दिसत आहे. यावरुनच कुठेतरी पाणी मुरतंय हे स्पष्ट दिसत आहे. हा सांस्कृतिक दहशतवाद आहे. मी पहिल्यापासून सांगत आहे. जर मी असे काही केले असेल तर मग तुम्ही इतके दिवस गप्प का बसलात, काही कारण का देत नाही. मला रितसर लेखी देऊन माझी बाजू मांडायला लावून का काढलं नाही? कुठेतरी हे राजकीय हेतूने झालेले आहे,” असे त्यांनी सांगितले.
“पहिल्यांदा व्यावसायिक कारणांमुळे काढून टाकले असे कारण त्यांनी सांगितले. राजकीय मुद्द्यामुळे मला काढून टाकले असे मी पहिल्यापासून एकच मुद्दा धरुन ठेवला आहे. महिलांशी गैरवर्तन म्हटले तर माणूस पूर्ण बॅकफूटवर जातो. जर असं काही असेल तर मग तक्रार का केली नाही? त्याचवेळी का केली नाही? त्या बायकांनी सहन का केले? एखादी मुस्काटात का दिली नाही? जर मी अपशब्द वापरत असेन तर मग इतर महिला माझी बाजू का घेतात? तो आम्हाला बापासारखा, भावासारखा होता, असे का सांगत आहेत,” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
“महिलांशी गैरवर्तन यावर मी काहीतरी निश्चितच कारवाई करणार आहे. वकिलांचा सल्ला घेऊन मी खूप मोठी कारवाई करणार आहे. जर मी काही केले होते तर मग तुम्हाला ५० तास का लागले हे स्पष्टीकरण द्यायला. त्या तिघींचा साचा एकच होता बोलण्याचा. तर दुसरीकडे त्या इतर महिलांनी अत्यंत संयमीपणे बोलत आहेत. याचा मालिकेवर परिणाम होईल की नाही माहिती नाही. पण माझ्या आयुष्यावर, करिअरवर परिणाम झाला आहे. एखादा दुसरा असता तर त्याने आत्महत्या केली असती किंवा मी आताही मरु शकतो,” असेही त्यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मा लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी विलास पाटील हे पात्र साकारलं होतं. अल्पावधीतच हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं. किरण माने हे अनेकदा त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असायचे. ग्रामीण भाषेतील लहेजा त्यांच्या लेखणीमधून स्पष्टपणे जाणवतो. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात. मात्र आता याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणी सापडले आहेत. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर #istandwith_KiranMane हा हॅशटॅग चर्चेत आला होता. अनेकांनी किरण मानेंवर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचं म्हटलंय. मात्र त्याच वेळेस त्यांच्यावर टीकाही केली जाते होती.
दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने किरण माने प्रकरणी लेखी स्पष्टीकरण दिलं आहे. राजकीय भूमिका मांडत असल्याच्या कारणानं नाही तर अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः महिला कलाकारांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. तसेच किरण माने यांनी केलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचंही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.