बॉलिवूडमध्ये कॅट फाइट हा प्रकार काही नवा नाही. बॉलिवूड अभिनेत्री आमच्यात सारं काही आलबेल सुरू आहे असं कितीही दाखवत असल्या तरी त्यांच्यामध्ये सुरू असलेली भांडणं कधीना ना कधी समोर येतातच. असंच काहीसं घडलंय परिणीती- सोनाक्षीबद्दल. या दोघींमध्ये सध्या वाद सुरू आहे आणि ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाच्या निमित्तानं हा वाद सर्वांसमोर आला आहे.
अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात सोनाक्षी आणि परिणीतीदेखील आहेत. मात्र आपणच या चित्रपटातली मुख्य अभिनेत्री असल्याचं सोनाक्षी सर्वांना सांगत असल्यानं परिणीती नाराज आहे. परिणीतीनं याबद्दल प्रोडक्शन हाऊसकडे तक्रारही केली असल्याचं समजत आहे.
या चित्रपटात दोघींच्या समान भूमिका आहेत असं असताना सोनाक्षीनं मुख्य अभिनेत्री असल्याचा दावा करणं परिणीतीला खटकलं, या कारणावरूनच दोघींमध्ये वाद सुरू असल्याचं समजत आहे. परिणीतीनं सेटवर सोनाक्षीशी संवाद सांधणं बंद केलं आहे. तसेच त्या दोघीही एकमेकांना टाळत असल्याचं समजत आहे.
‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट भारत पाक युद्धातील हवाई दलाच्या योगदानावर आधारित आहे, अजय या चित्रपटात स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांची भूमिका साकारणार आहे. भारत पाक युद्धादरम्यान कर्णिक हे हवाई दलाच्या भूज तळावर नियुक्त होते. युद्धादरम्यान पाकिस्तान हवाई दलाच्या हल्ल्यात भूज तळावरील धावपट्टी उद्ध्वस्त झाली. त्यावेळी कर्णिक यांनी धाडसी निर्णय घेत आजूबाजूच्या गावातील महिलांकडे तळाची बांधणी करण्यासाठी मदत मागितली होती. ३०० महिलांच्या मदतीनं त्यांनी तळ पुन्हा बांधला होता. त्यांनी घेतलेला धाडसी निर्णय आणि हवाई दलाचं योगदान याची शौर्यगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.