जगप्रसिद्ध ब्रिटीश बँड कोल्डप्लेचा प्रमुख गायक ख्रिस मार्टिनने त्याच्या बँडसह अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला. मात्र, त्याने प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘वंदे मातरम’ आणि ‘मां तुझे सलाम’ सादर करत प्रेक्षकांच्या मनाला हात घातला. या वेळी स्टेडियममध्ये जोरदार जयघोष झाला आणि टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळाला.
कोल्डप्लेचे अहमदाबाद कॉन्सर्ट २५ आणि २६ जानेवारी रोजी मोटेरामधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले होते. बँडने १८ जानेवारी रोजी नवी मुंबईत ‘म्युझिक ऑफ द स्फीयर्स इंडिया टूर’ची सुरुवात केली होती. त्यांनी १८, १९ आणि २१ जानेवारी रोजी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये परफॉर्मन्स केला.
ख्रिस मार्टिनच्या त्याच्या चाहत्याने त्याच्या अहमदाबाद कॉन्सर्टमधील व्हायरल व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले, “ख्रिसच्या चाहत्यांकडून त्याला या सादरीकरणासाठी खूप खूप धन्यवाद”, दुसऱ्याने कमेंट करत “जय हिंद” असे लिहिले.
ख्रिस मार्टिनने अहमदाबाद कॉन्सर्टमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी एक गाणे म्हटले. याआधी त्याने नवी मुंबईत येथे झालेल्या कॉन्सर्टमध्ये जसप्रीत बुमराह जगातील सर्वात उत्कृष्ट गोलंदाज आहे असे बोलून त्याचे कौतुक केले केले होते. त्याने शाहरुख खानचेही या कॉन्सर्टमध्ये कौतुक केले होते.
नवी मुंबई येथील कॉन्सर्टदरम्यान, ख्रिस मार्टिनने ब्रिटिश राजवटीत भारतावर झालेल्या अन्यायांसाठी माफीही मागितली. याशिवाय, क्रिस मार्टिनने सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या पाचव्या वर्धापनदिन सोहळ्यात देखील सहभाग घेतला.
हिंदी आणि मराठीत ख्रिस मार्टिनचा खास अंदाज
ख्रिस मार्टिनने त्याच्या बँड कोल्डप्लेसह कॉन्सर्टमध्ये खास अंदाज दाखवत भारतातील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. १९ जानेवारी रोजी त्याच्या नवी मुंबईतील परफॉर्मन्सदरम्यान, त्याने स्टेजवर हिंदीत काही वाक्ये बोलली. त्यांनी म्हटले, “आप सभी का हमारे शो में स्वागत है.” याशिवाय, त्याने मराठीतही काही शब्द बोलले. “तुम्ही सगळे आज छान दिसताय,” असे त्यांनी म्हटले. त्यांच्या या अंदाजाने प्रेक्षकांना खुश करून टाकले आणि स्टेडियम जल्लोषाने भरून गेले.
शाहरुख खानने खास पार्टी दिली होती
शाहरुख खान आणि ख्रिस मार्टिन यांचे नाते नवीन नाही. २०१६ मध्ये कोल्डप्ले ग्लोबल सिटीजन फेस्टिवलसाठी भारतात आले होते. त्या कॉन्सर्टनंतर शाहरुख खानने त्यांच्या ‘मन्नत’ या घरी खास पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकार आणि कोल्डप्ले बँडने एकत्र धमाल केली होती.