तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला कोल्डप्ले बँडचा प्रमुख गायक ख्रिस मार्टिन जानेवारी २०२५ मध्ये त्याच्या कॉन्सर्ट निमित्त भारतात आला आहे. भारतात आल्यापासून तो देशातील विविध ठिकाणांना भेटी देत आहे. मुंबईत आल्यावर त्याने बाबूलनाथ मंदिराला भेट दिली होती. त्याच्याबरोबर त्याची प्रेयसी आणि हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री डेकोटा जॉन्सनसुद्धा यावेळी उपस्थित होती. डेकोटाने बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेबरोबर सिद्धिविनायक मंदिरात हजेरी लावली होती. आता या जोडप्याने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ मेळ्यात हजेरी लावली आहे.
काल संध्याकाळी (२७ जानेवारी २०२५) ख्रिस मार्टिन आणि त्याची प्रेयसी, अभिनेत्री डेकोटा जॉन्सन, प्रयागराजमध्ये पोहोचल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. भगव्या कपड्यांमध्ये कपल कॅमेऱ्यासमोर हसत हात हलवताना दिसले. सध्या ख्रिस मार्टिन आपल्या बँड कोल्डप्लेच्या ‘म्युझिक ऑफ द स्फीयर्स वर्ल्ड टूर’ अंतर्गत भारतात आहे. त्याने आतापर्यंत मुंबई आणि अहमदाबाद येथे परफॉर्मन्स केला आहे. ख्रिस मार्टिन आणि डेकोटा त्रिवेणी संगमात स्नान करणार असल्याचे बोलले जात आहे.
#WATCH | Uttar Pradesh | American actress Dakota Johnson and co-founder of the rock band Coldplay & singer Chris Martin at Prayagraj #MahaKumbhMela2025 pic.twitter.com/8kttMyjrdG
— ANI (@ANI) January 27, 2025
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ख्रिस मार्टिन आणि डेकोटाच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत “आय लव्ह द ख्रिस भाई” अशी कमेंट केली आहे. तर दुसर्याने “ख्रिस भाऊ काय कमाल” अशी कमेंट केली आहे. काहींनी क्रिश भाई म्हणत कमेंट केल्या आहेत.

महाकुंभात सामील होण्याआधी ख्रिस मार्टिनने अहमदाबादमध्ये त्याच्या कॉन्सर्ट केला. यात कॉन्सर्टमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त त्याने सर्व भारतीयांना शुभेच्छा देत ‘वंदे मातरम’ आणि ‘माँ तुझे सलाम’ हे गाणे गायले. याच कॉन्सर्टदरम्यान ख्रिस मार्टिनने भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे कौतुक करत त्याचसाठी एक गाणे गायले. हे व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ख्रिस मार्टिनने त्याच्या बँड कोल्डप्लेसह कॉन्सर्टमध्ये खास अंदाज दाखवत भारतातील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. १९ जानेवारी २०२५ रोजी त्याच्या नवी मुंबईतील परफॉर्मन्सदरम्यान, त्याने स्टेजवर हिंदीत काही वाक्ये बोलली. त्याने म्हटले, “आप सभी का हमारे शो में स्वागत है.” याशिवाय, त्याने मराठीतही काही शब्द बोलले. “तुम्ही सगळे आज छान दिसताय,” असे त्याने म्हटले. त्याच्या या अंदाजाने प्रेक्षकांना खुश करून टाकले आणि स्टेडियम जल्लोषाने भरून गेले.