मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी देण्यात येणाऱ्या ‘कलर्स-मिक्ता’ पुरस्कार सोहळ्याचे दिमाखदार आयोजन नुकतेच दुबई येथे करण्यात आले होते. मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधील अनेक कलाकार पुरस्कार सोहळ्यास मोठय़ा संख्येने उपस्थित होते. नृत्य, संगीत, प्रहसन यांचा समावेश असलेल्या या सोहळ्याचे प्रसारण २२ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ई टीव्ही मराठीवरून (अर्थात लवकरच नव्याने नामकरण होणाऱ्या ‘कलर्स-मराठी’) वाहिनीवरून केले जाणार आहे.

सुमारे तीन ते साडेतीन तास रंगलेल्या या सोहळ्यातील विविध कार्यक्रमांत मराठीतील अनेक नामवंत कलाकार सहभागी झाले होते. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित दुबईकर रसिकांकडून टाळ्या आणि शिटय़ांची उत्स्फूर्त दाद वेळोवेळी मिळत होती.
अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी मराठी चित्रपटसृष्टी, त्यातील काही कलाकार व दिग्दर्शक आणि त्यांच्याविषयी प्रेक्षकांना पडणारे काही प्रश्न खुमासदारपणे खास त्यांच्या शैलीत सादर केले.
‘एकाही मराठी नटाची सुपारी कोणी घेतल्याचे ऐकलाय का, उलट मराठी नटच वेगवेगळ्या सुपाऱ्या घेऊन आज इथे तर उद्या तिथे जात असतात’ किंवा ‘मराठी पिक्चरपेक्षा थिएटरच्या बाहेर बसलेल्या पॉपकॉर्नवाल्याचा धंदा जास्त चालतो’, अशा काही वाक्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला. जर मराठी नटांना खंडणीसाठी कोणाचा दूरध्वनी आला तर त्या फोनवर काही मराठी कलाकार कसे बोलतील, याविषयावरील त्यांच्या सादरीकरणालाही उपस्थितांची दाद मिळाली.
भाऊ कदम, भारत गणेशपुरे आणि सहकारी कलाकार यांनी सादर केलेला प्रवेश, डॉ. नीलेश साबळे यांनी उपस्थित काही कलाकारांना बोलते करून त्यांच्याकडून म्हणवून घेतलेले अमिताभ बच्चन यांचे गाजलेले काही संवादही रंगले.
अभिनेत्री प्रिया बापट (ही पोळी साजुक तुपातली), सोनाली कुलकर्णी (ये मेरा दिल प्यार का दिवाना), मृण्मयी देशपांडे (आ रे प्रीतम प्यारे) तसेच मानसी नाईक, अभिनेता अंकुश चौधरी आणि अन्य काही कलाकारांचे नृत्य सादरीकरणही जोरदार झाले. तसेच सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, सचिन खेडेकर आणि अन्य काही कलाकार या रंगलेल्या सोहळ्याच्या सादरीकरणात सहभागी झाले होते.

Story img Loader