अतुल परचुरे यांना कारकिर्दीत विनोदी अभिनेता म्हणून खास ओळख लाभली. मात्र, त्यांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये वैविध्य आणि ताजेपणा असायचा. ष्टपैलू अभिनयाच्या जोरावर अतुल परचुरे यांनी रंगभूमी, मालिका विश्व आणि चित्रपटसृष्टी गाजवत प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

परचुरे यांनी बालनाट्याच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण केले होते. त्यानंतर विविध आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून त्यांनी आंतरमहाविद्यालयीन विश्वावर आपल्या अभिनयाची विशेष छाप सोडली. एकांकिकांच्या माध्यमातून निरनिराळ्या भूमिका साकारत सुरू झालेला त्यांचा प्रवास काही वर्षांनी व्यावसायिक रंगभूमीवर येऊन स्थिरावला. बालकलाकार म्हणून सुरुवात करून व्यावसायिक कलाकार म्हणून नावारुपाला आलेल्या काही मोजक्या कलाकारांमध्ये अतुल परचुरे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘नातीगोती’ , ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘बे दुणे पाच’ आदी नाटकांमधील त्यांच्या भूमिका चर्चेत राहिल्या. त्यांनी ‘नातीगोती’ या नाटकात विशेष मुलाची साकारलेली भूमिका गाजली आणि त्यांच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक केले गेले.

हेही वाचा >>>अतुल परचुरेंनी ‘या’ चित्रपटात साकारलेली अशोक सराफ यांच्या बालपणीची भूमिका; ज्येष्ठ अभिनेते आठवण सांगताना झाले भावुक

मराठीच्या पलीकडे जाऊन त्यांनी तीन हिंदी – इंग्रजी नाटकांमध्येही काम केले होते. भरत दाभोळकरांबरोबर त्यांनी ‘फनी थिंग कॉल्ड लव्ह’ आणि ‘मंकी बिझनेस’ अशा काही ‘हिंग्लिश’ नाटकांमध्ये काम केले होते. जाहिरातींबरोबरच हिंदीतही त्यांनी ‘पार्टनर’, ‘जजंतरम ममंतरम’, ‘बिल्लू बार्बर’, ‘सलाम – ए – इश्क’, ‘आवारापन’, ‘कलकत्ता मेल’ अशा चित्रपटांतील विनोदी भूमिकांमधून लक्ष वेधून घेतले होते. मराठीत त्यांनी ‘गोलमाल’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आम्ही सातपुते’, ‘जाणीव’, ‘नारबाची वाडी’, ‘झक्कास’ अशा चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या होत्या. त्यांनी त्यांनी ४० पेक्षा अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधून विविधांगी भूमिका केल्या होत्या.

परचुरे यांची दूरचित्रवाहिनीवरील कारकिर्द सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण होती. त्यांनी हिंदीत ‘आर. के. लक्ष्मण की दुनिया’, ‘यम है हम’, ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या मालिकांबरोबरच ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत भूमिका केल्या होत्या. त्यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘जागो मोहन प्यारे’ आणि त्याचाच दुसरा भाग असलेली ‘भागो मोहन प्यारे’ या दोन मालिका प्रेक्षकांत लोकप्रिय ठरल्या. २०२० मध्ये त्यांनी ‘माझा होशील ना’ या मालिकेत खलनायकी भूमिका केली होती. ‘अळीमिळी गुपचिळी’ या तारांकित कलाकारांशी गप्पांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलनही त्यांनी केले होते. ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ हा अतुल परचुरेंचा शेवटचा सिनेमा ठरला. अतुल परचुरे यांना यावर्षी एप्रिल महिन्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दीनानाथ मंगेशकरांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार आणि तोही महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मिळाल्या नंतर स्वप्नपूर्तीचा क्षण अनुभवल्याचा आनंद त्यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केला होता.

हेही वाचा >>>“आपण समोरच्यासाठी काय आहोत…”, अतुल परचुरेंचा जगणं शिकवणारा VIDEO व्हायरल; आपलं खरा मित्र कोण सांगत म्हणालेले…

पुलं’ची आठवण

रंगभूमी, जाहिरातीतून त्यांचे नाव गाजत असतानाच त्यांच्याकडे ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकात पु. ल. देशपांडे यांची भूमिका करण्याची संधी चालून आली. ‘त्यावेळी पु.लं.शी माझी ओळख नव्हती. ही भूमिका दिलीप प्रभावळकर किंवा विक्रम गोखले यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांकडे जाईल असे मला वाटले होते. मात्र त्यावेळी माझे बाह्यरुप हे साधारण पुलंच्या तरुणपणातील रुपाच्या जवळपास जाणारे होते. त्यामुळे निर्मात्यांनी स्वत:च त्यांना मला ही भूमिका देण्याविषयी विचारण केली. पुलंनी लगेच होकार दिला आणि ही भूमिका मला मिळाली’ अशी आठवण अतुल यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितली होती. या नाटकातील भूमिकेनंतर पु. ल. देशपांडे म्हणजे अतुल परचुरे हे समीकरण ठरून गेले होते.

पार्कातील क्रिकेटपटू

मनोरंजनसृष्टीच्या पलीकडे अतुल परचुरे यांचे क्रिकेट या खेळावर विशेष प्रेम होते. नाटकाच्या तालमीमधून काहीसा वेळ मिळाल्यानंतर ते दादरमधील शिवाजी पार्क परिसरात मित्रमंडळींसोबत क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद घेत असत. तसेच त्यांनी भारतातील विविध भागांसह परदेशात जाऊनही क्रिकेटचे सामने पाहण्याचा आनंद लुटला होता.