प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा छोटा पडदा गाजवल्यानंतर आता लवकरच नेटफ्लिक्सवर झळकणार आहे. नेटफ्लिक्सवरील स्टँड अप I’m Not Done Yet या शोमधून कपिल शर्मा प्रेक्षकांचं मनोरंज करणार आहे. कपिल आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन यासंबंधी माहिती दिली आहे. “मी गेल्या २५ वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे आणि टीव्हीत मला १५ वर्ष झाली. आम्ही पंजाबी नेहमीच मस्तीच्या मूडमध्ये असल्याने मी कधीही कॉमेडी गांभीर्याने घेतली नव्हती. ते नैसर्गिक असून याचे पैसेही मिळतात हे मला माहिती नव्हतं,” असं कपिल शर्मा या व्हिडीओत सांगत आहे.
कपिल शर्माने यावेळी, “प्रत्येक कलाकाराच्या आतून एक आवाज येत असतो की अजूनही माझं काम पूर्ण झालेलं नाही, मला अजून काही वेगळं करायचं आहे. पण कुठे? त्यावेळी नेटफ्लिक्सने मला आकर्षित केलं. त्यांनी आम्ही तुमची गोष्ट ऐकण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं,” अशी माहिती दिली.
कपिल शर्माने व्हिडीओच्या शेवटी या स्टँड अपमधून अनेक नव्या गोष्टी पहायला मिळतील असं सांगितलं आहे. दरम्यान या स्टँडअपमधील प्रोमो शेअर करण्यात आला असून यामध्ये कपिल शर्माने वादग्रस्त ठरलेल्या त्या ट्वीटचा उल्लेख केला आहे ज्यामध्ये त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केलं होतं. दारुच्या नशेत आपण ते ट्वीट केल्याचंही त्याने यावेळी मान्य केलं.
“मी लगेच मालदीवसाठी निघून गेलो. मी तिथे ८ ते ९ दिवस राहिले. मालदिवला पोहोचलो तेव्हा मी त्यांनी इंटरनेट नसलेली रुम द्या असं सांगितलं. यावर त्यांनी तुमचं लग्न झालंय का? असं विचारलं. त्यावर मी नाही, ट्वीट केलं आहे असं उत्तर दिलं. तिथे राहण्यासाठी मला ९ लाख खर्च करावे लागले. इतके पैसे तर मी माझ्या शिक्षणावरही खर्च केले नाहीत. ते एक वाक्य मला खूप महागात पडलं,” असा खुलासा यावेळी कपिलने केला आहे.
पुढे बोलताना कपिलने आपण ट्विटरविरोधात खटला दाखल करणार असल्याचं म्हटलं. ट्विटरने आपल्या फॉलोअर्सना हे ड्रंक ट्विट असल्याचं सांगायला हवं असं म्हटलं. यावेळी त्याने काही ट्वीट आपली जबाबदारी असून इतर हे दारुच्या बँड्रचा परिणाम असल्याचं म्हटलं.
काय होतं ते ट्वीट –
२०१६ मध्ये कपिल शर्माने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मुंबई महापालिकेविरोधात तक्रार केली होती. “मी गेल्या पाच वर्षांपासून १५ कोटींचा आयकर भरत असतानाही माझं ऑफिस तयार करण्यासाठी पालिकेला पाच लाखांची लाच द्यावी लागत आहे,” असं कपिल शर्माने या ट्वीटमध्ये सांगितलं होतं. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. पालिकेने यानंतर कपिल शर्माच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली होती.