‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून पदार्पण करणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी विनोदाच्या विश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं. १० ऑगस्ट रोजी जीममध्ये व्यायाम करत असताना राजू हार्ट अटॅकमुळे अचानक खाली कोसळले आणि त्यांना थेट एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर कायम त्यांच्या तब्येतीविषयी बातम्या येत होत्या. मध्यंतरी राजू यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं होतं. अखेर आज त्यांची मृत्यूशी चाललेली दीर्घकाळ झुंज संपली.
बॉलिवूड तसेच मनोरंजनविश्वातल्या कित्येक दिग्गजांनी राजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनिल कपूर, सोनू सुद, विवेक अग्निहोत्री, राजपाल यादव, सुनील पाल अशा दिग्गजांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हळहळ व्यक्त केली आहे. नुकतंच कपिल शर्मा या कॉमेडीयननेही राजू यांच्याबद्दल भाष्य केलं आहे. राजू यांच्याप्रमाणे कपिलनेही एका रीयालिटि शोमधून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. राजू यांच्याकडून कपिलसारख्या कित्येक नवोदित कलाकारांनी विनोदाच्या टायमिंगचे धडे गिरवले आहेत.
आणखी वाचा : “अमिताभ बच्चन यांच्यामुळे…” दिवंगत कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांनी मानले होते आभार
राजू याच्या जण्याने भावुक झालेल्या कपिल शर्माने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर राजू यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की, “राजू, आज प्रथमच तुम्ही मला रडवलं आहे. तुमची एकदा भेट घ्यावी अशी मनापासून इच्छा होती. तुमची खूप आठवण येईल.” कपिलच्या या पोस्टवर कित्येक चाहत्यांनी ‘विनोदविश्वासाठी काळा दिवस’ असं म्हणत शोक व्यक्त केला आहे.
उत्तरप्रदेशमधील कानपूर येथे मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या राजू श्रीवास्तव यांना २००५ नंतर ओळख मिळाली. मंचावर साकारलेलं ‘गजोधर भैय्या’ हे पात्र आजही लोकांच्या स्मरणात आहे. याबरोबरच बिग बॉसमध्येही राजू श्रीवास्तव यांनी हजेरी लावली तसेच त्यांनी बऱ्याच चित्रपटातही छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. मनोरंजनविश्वाचं हे खूप मोठं नुकसान आहे.