गेल्या काही दिवसांपासून लोकप्रिय स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा ( Kunal Kamra ) खूप चर्चेत आहे. एका शोमध्ये कुणालने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्यामुळे राज्यातल्या राजकारणात हंगामा झाला. कुणालच्या विरोधात शिवसेना ( शिंदे ) पक्षाचे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कुणाल विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची शिवसेनेच्या नेत्यांकडून मागणी केली गेली. पण, अलीकडेच मद्रास उच्च न्यायालयाकडून त्याला दिलासा मिळाला. अटकेपासून संरक्षणाची मुदत वाढवली. याप्रकरणी कुणालला ५००हून अधिक धमक्या आल्या. अशा या चर्चेत असणाऱ्या स्टॅण्डअप कॉमेडियनला सलमान खानचा ( Salman Khan ) वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ची ( Bigg Boss ) ऑफर देण्यात आली होती. पण, कुणाल कामराने ‘बिग बॉस’ची ऑफर नाकारली.
कुणाल कामराने ‘बिग बॉस’ची ऑफर आल्यासंदर्भात इन्स्टाग्रामवर व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला होता. या चॅटमध्ये ‘बिग बॉस’शी संबंधित असलेल्या व्यक्तीशी कुणालचे संवाद होते. समोरच्या व्यक्तीने कुणालला मेसेज केला होता की, मी ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वाचं कास्टिंग पाहत आहे. तुमचं नाव शोसाठी इन्ट्रेस्टिंग वाटतं आहे. मला माहीत आहे की, हा तुमच्या पुढच्या कामाचा भाग नाहीये. पण तुम्ही या प्लॅटफॉर्मद्वारे मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांशी कनेक्ट होऊ शकता आणि तुमचा खरा स्वभाव दाखवू शकता. तसंच प्रेक्षकांचं मनं जिंकू शकता. तुम्हाला याबाबत काय वाटतं? याबद्दल आपण पुढे बोलू शकतो का?
कुणाल कामराने त्या व्यक्तीच्या मेसेजवर जबरदस्त प्रतिक्रिया देत नकार दिला आहे. कुणाल म्हणाला, “यापेक्षा वेड्याच्या दवाखान्यात दाखल झालेलं बरं.” कुणालने या चॅटचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत सलमान खानचं ‘राधे’ चित्रपटातील गाणं लावलं आहे. पण, कुणालला ‘बिग बॉस १९’ की ‘बिग बॉस ओटीटी ४’ साठी विचारणा झालीये हे स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, गेल्या वर्षी ‘बिग बॉस’चं १८वं पर्व चांगलंच गाजलं होतं. या पर्वाचा विजेता करणवीर मेहरा झाला होता. यंदा ‘बिग बॉस’चं १९वं पर्व असणार आहे. या पर्वासाठी कुणाल व्यतिरिक्त धनश्री वर्मा व अपूर्वा मखीजा यांना विचारण्यात आलं आहे.