प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन आणि सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या कुणाल कामराची ख्याती आता चांगलीच वाढली आहे. २०१७ मध्ये त्याने स्टॅण्डअप कॉमेडिला सुरुवात केली. तर, २०१९ पासून त्याने त्याचा स्वतंत्र शो सुरू केला. याचे व्हिडिओ त्याने युट्यूबवरही अपलोड केले. युट्यूबवर अपलोड केलेल्या शोमध्ये त्याने विविध विषय विनोदी अंगाने मांडले. काहींच्या दिलखुलास आणि रंजक मुलाखतीही घेतल्या. या मुलाखतीला अनेक राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली. पण गेल्या वर्षभरात त्याच्या एकाही युट्यूब व्हिडिओला एक मिलिअन म्हणजेच १० लाखांएवढे व्ह्युज मिळाले नव्हते. मात्र, कालच्या एका प्रकरणामुळे तो थेट चार मिलिअन म्हणजेच ४० लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाय. हे आम्ही तोंडदेखलं सांगत नाही, तर त्याच्या युट्यूब व्हिडिओजच्या व्हुयजनुसारच सांगत आहोत.

२०१७ पासून व्हिडिओंना सुरुवात

कुणाल कामराने २ मार्च २०१७ रोजी पहिला व्हिडिओ पब्लिश केला होता. त्याने आतापर्यंत २४९ व्हिडिओ पब्लिश केले असून आतापर्यंत संपूर्ण व्हिडिओतून त्याला ३२२,१४९,८२० एवढे व्ह्युज मिळाले आहेत. तर त्याचे २.४ मिलिअन सबस्क्रायबर्स आहेत. गेल्यावर्षी २५ फेब्रुवारी २०२४ ला पब्लिश केलेल्या त्याच्या एका व्हिडिओला तीन मिलिअनहून अधिक व्ह्युज आहेत. पण त्यानंतर वर्षभरात एकाही व्हिडिओने १ मिलिअन क्रॉस केलेले नाहीत. या वर्षभरात त्याची व्ह्युजची धाव सात लाखांपर्यंतच होती. या वर्षभरात त्याने अनेकविध सामाजिक, राजकीय विषयांवर व्हिडिओ बनवले आहेत. शैक्षणिक, आरोग्य, महिला, निवडणुकीतील वचननामे, शेतकरी, रोजगार आदी गंभीर मुद्द्यांनाही हात घातला आहे. तर, शट अप या कुणालचेही काही भाग प्रसारित करण्यात आले आहेत.

स्टॅण्डअप कॉमेडी गाजली पण…

दरम्यान, वर्षभरापूर्वी म्हणजेच २०२४ पूर्वी कुणालने जे स्टॅण्डअप कॉमेडीचे व्हिडिओ टाकले आहेत, त्याला एक मिलिअनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. तर, स्टॅण्डअप कॉमेडी व्यतिरिक्त जे व्हिडिओ आहेत, त्याला एक मिलिअनपेक्षा कमी व्ह्युज असल्याचं दिसतंय. दरम्यान, कुणालच्या पॉप्युलर व्हिडिओच्या सेक्शनमध्ये त्याच्या एका जुन्या व्हिडिओला २६ मिलिअन व्ह्युजही मिळाले आहेत. एकूणच कुणालचे स्टॅण्डअप कॉमेडीचे व्हिडिओ तुफान चालले आहेत. तर इतर विषयांवरच्या व्हिडिओंना लाखांच्या घरात प्रेक्षकांनी पाहिलं.

‘नया भारत’मुळे मिळाली उभारी?

आता दोन दिवसांपूर्वी ‘नया भारत’ नावाने जो मूळ व्हिडिओ कुणालने अपलोड केला, त्याला दोन दिवसांत ४.४ मिलिअन व्ह्युज मिळालेत. ज्या गाण्यामुळे वाद उफाळून आला, त्या गाण्याच्या क्लिपला १.२ मिलिअन व्ह्युज मिळाले. तर, आता तासाभरापूर्वी अपलोड केलेल्या व्हिडिओला १६ हजार व्ह्युज आहेत. या व्ह्युजची संख्या तासागणित वाढत जातेय.

इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काय स्थिती?

वादग्रस्त ठरलेला कॉमेडी व्हिडिओ महाराष्ट्रासह देशभर चर्चेचा विषय ठरला. विधानसभेत यावर खडाजंगी तर झालीच, शिवाय संसदेच्या आवारातही अनेक नेत्यांनी याविषयी विरोधात आणि समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे राजकारणात विशेष रस असणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडिओ आवर्जुन पाहिला आहे. दरम्यान, ही संख्या केवळ युट्यूब युजर्सची. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हे व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याच्या व्ह्युजची गणतीही आता अशक्य आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्याला एक्सवर ४ मिलिअनपेक्षा अधिक व्ह्युज आहेत. तर, इन्स्टाग्रामवर २ मिलिअन व्ह्युज आहेत.