प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीला मुंबईत होणारे शो रद्द करावे लागले आहेत. गुजरातच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिल्यानंतर मुनव्वर फारुकीचे दोन कार्यक्रम रद्द केले गेले आहेत. मुंबईच्या वांद्र्यातील रंगशारदा सभागृहाच्या मालकाला धमकावल्याने त्यांनी हा शो रद्द केला आहे. तर बोरिवलीतील एका सभागृहाच्या मालकालाही धमकावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मुनव्वर फारुकीला मुंबईतील दोन्ही शो रद्द करावे लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरातील बोरिवली या ठिकाणी उद्या (२९ ऑक्टोबर) रोजी एक शो आयोजित करण्यात आला होता. तर येत्या ३० आणि ३१ ऑक्टोबरला वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात एका शो चे आयोजन केले गेले होते. मात्र आयोजकांना हा शो रद्द करावा लागल्याचे कारण म्हणजे, एका कट्टरतावादी संघटनेने फारुकीविरोधी एक ऑनलाईन मोहिम राबवली होती. तसेच या सभागृहाच्या मालकाला धमकावले होते.
रंगशारदा सभागृहाच्या मालक पूर्णिमा शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मंगळवारी दुपारी बजरंग दलाच्या तीन कार्यकर्त्यांनी मला धमकावले. हा शो हिंदूविरोधी असल्याचे त्यांनी मला सांगितले. मात्र मी त्यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाही सांगितले की, या शोच्या आयोजकांना सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले आहे. पण असे असतानाही ते आम्हाला धमक्या देत होते. जर या ठिकाणी हा शो झाला तर आम्ही या ठिकाणी जाळपोळ करु. यामुळेच आम्ही शो रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान यावेळी मी पोलिसांना फोनही केला होता. पोलिसांनीच त्या लोकांना रंगशारदा सभागृहाच्या आवारातून बाहेर काढले,” असेही त्यांनी सांगितले.
या घटनेनंतर एका व्यक्तीच्या मते, “पोलिसांनीही आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. त्यामुळे आमच्यावर प्रचंड दबाव होता. अशा परिस्थितीत प्रेक्षकांच्या सुरक्षेचा विचार करून आम्ही शो रद्द केला. मात्र, एखाद्या कलाकाराला त्याच्या धर्मामुळे आणि त्याच्या काही विनोदांमुळे टार्गेट केले जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. या शोमध्ये हिंदूंच्या भावना कोणत्याही प्रकारे दुखावल्या जाणार नाहीत, असेही आम्ही पोलिसांना स्पष्ट शब्दात सांगितले होते,” असे एका व्यक्तीने सांगितले.
“गरज भासल्यास एखाद्याच्या कानशिलातही लगावू शकेल इतकं…”, समांथाची पोस्ट चर्चेत
दरम्यान वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. “आम्ही बजरंग दलाल काही चुकीचे पाऊल उचलल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे बजावले होते. तसेच आम्ही आयोजकांना याबाबत नोटीसही पाठवली होती,” असे मनोहर धनावडे म्हणाले.