विनोदवीर राजपाल यादवची मोठी कन्या ज्योती यादव १९ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकली. कुंडरा या गावात हा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. राजपाल यादव हे बॉलिवूडमधील मोठे नाव असले तरी या विवाहसोहळ्यात बॉलिवूडमधील कोणतीच व्यक्ती उपस्थित नव्हती. राजपालने आपल्या कुटुंबाला नेहमीच लाइमलाईटपासून दूर ठेवणे पसंत केले आहे. त्यामुळेच अगदी जवळील मित्र-परिवारामध्येच हा लग्न सोहळा संपन्न झाला.
ज्योतीचा नवरा संदीप यादव हा आग्रा येथील सहकारी बँकेत कॅशिअर आहे. या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये राजपाल आपल्या जावयाशी निवांत गप्पा मारताना दिसत आहे.
ज्योतीने लग्नात लाल आणि सोनेरी रंगाचा लेहंगा घातला होता तर संदीपनेही लेहंग्याला साजेशी शेरवानी घातली होती. ज्योती ही राजपालची पहिली पत्नी करुणाची मुलगी आहे. ज्योतीच्या जन्मानंतर करुणाचा मृत्यू झाला होता. आईच्या मृत्यूनंतर सुमारे १५ वर्षे ज्योती कुंडरा गावात राहत होती. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ती आपल्या वडिलांसोबत राहायला लागली. यादरम्यान २००३ मध्ये राजपालने त्याच्याहून नऊ वर्षांनी लहान असणाऱ्या राधाशी लग्न केले.
राजपाल ‘हिरो’ सिनेमाच्या चित्रीकरणासाठी कॅनडाला गेला असता तिथे त्याची ओळख राधाशी झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. राधा आणि राजपाल यांना हनी नावाची एक मुलगीही आहे.