सुप्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचं २१ सप्टेंबर २०२२ रोजी दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये निधन झालं. जवळपास ४१ दिवस राजू श्रीवास्तव यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांना बिग बी अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकवला जात होता. स्वतः अमिताभ यांनीही याबाबत खुलासा केला. राजू अमिताभ यांना गुरु मानायचे. त्यांच्या कठीण प्रसंगांमध्येही अमिताभ यांनी राजू श्रीवास्तव यांची साथ दिली. आता राजू श्रीवास्तव यांच्या लेकीने बिग बी यांचे आभार मानले आहेत.

आणखी वाचा – Video : …अन् शोकसभेदरम्यान राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी ढसाढसा रडल्या, म्हणाल्या, “आयुष्यच संपलं…”

राजू श्रीवास्तव यांची लेक अंतराने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने बिग बींचे आभार मानत त्यांनी आम्हाला कठीण प्रसंगामध्ये पाठिंबा दिला असल्याचंही म्हटलं आहे. राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर त्यांचं कुटुंबीय कोलमडून गेलं आहे.

राजू श्रीवास्तव यांची लेक काय म्हणाली?
“या कठीण प्रसंगामध्ये आम्हाला साथ दिल्याबद्दल मी श्री अमिताभ बच्चन यांचे आभार मानू इच्छिते. तुमच्या प्रार्थनेमुळे आम्हाला ताकद व पाठिंबा मिळाला. हे आम्ही कायम लक्षात ठेवू, तुम्ही माझ्या वडिलांचे प्रेम, मार्गदर्शक, गुरु आहात. मोठ्या पडद्यावर जेव्हा माझ्या वडिलांनी तुम्हाला पाहिलं तिथपासून तुम्ही त्यांच्या बरोबर आहात. फक्त ऑनस्क्रिनच नव्हे तर ऑफस्क्रिनही ते तुम्हाला फॉलो करत होते.” असं अंतराने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पुढे ती म्हणाली, “त्यांनी त्यांच्या फोनमध्ये तुमचा नंबर गुरुजी म्हणून सेव्ह केला आहे. तुम्ही तुमचा आवाज रेकॉर्ड करून पाठवलेला ऑडिओ ऐकल्यानंतर त्यांची हालचाल होणं हे याबाबतचं मोठ उदाहरण आहे. माझा भाऊ आयुष्मान, माझी आई, मी अंतरा आणि माझं संपूर्ण कुटुंबीय तुमचे आभार मानतो. जगभरात त्यांना जे प्रेम मिळालं, त्यांचं कौतुक झालं हे फक्त तुमच्यामुळे आहे. धन्यवाद.” अंतराने ही पोस्ट शेअर करताना राजू श्रीवास्तव यांचा अमिताभ यांच्याबरोबरचा फोटोदेखील शेअर केला आहे.

Story img Loader