Legendary Comedian Raju Srivastava Health : आपल्या अस्खलित विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या बुधवारी (१० ऑगस्ट) राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र आता त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोललं जात आहे. राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूनेही काम करण्याचं बंद केल्याची माहिती त्यांचे मित्र आणि निकटवर्तीय सुनील पाल यांनी दिली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरासह विदेशातून प्रार्थना केली जात आहे.
राजू श्रीवास्तव यांचे मित्र आणि निकटवर्तीय सुनील पाल यांनी दिल्ली टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूनेही काम करणं बंद केलं आहे. आता राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार करण्यासाठी कोलकात्यावरुन डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं आहे. देशातील आघाडीच्या न्यूरोलॉजिस्ट पद्मा श्रीवास्तव या राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार करण्यासाठी कोलकात्याहून दिल्लीत दाखल झाल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. दुपारपासून त्यांची तब्बेत खालावत असल्याची माहिती समोर येत आहे.
नेमकं काय घडलं होतं?
राजू श्रीवास्तव हे बुधवारी १० ऑगस्टला व्यायामशाळेत ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक खाली पडले. यानंतर त्यांना प्रशिक्षकाने तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफी करण्यात आली आहे. यानंतर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालवत गेली. मात्र यादरम्यान ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे वृत्त समोर आलं होतं. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांचे चाहते ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे.
विश्लेषण : रिक्षाचालक ते स्टँडअप कॉमेडियन, राजू श्रीवास्तवचा प्रवास जाणून घ्या
राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध विनोदी कलाकार आहेत. ते अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग राहिले आहेत. त्यांची गणना देशातील सर्वोत्कृष्ट हास्यकलाकारांमध्ये केली जाते. राजू श्रीवास्तव ‘बिग बॉस’, ‘शक्तिमान’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’चा हिस्साही राहिले आहेत. त्यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘आये आठवा खदानी रुपया’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘बॉम्बे टू गोवा’ यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले.
राजू यांना सर्वात मोठे यश मिळाले ते ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये, जिथे ते उपविजेते होते. ‘गजोधर भैया’ हे त्यांचे प्रचलित पात्र जे आजही अनेकांच्या लक्षात आहेत. याव्यक्तिरिक्त त्यांनी अमिताभ बच्चन, लालू प्रसाद यादव, राम देव बाबा यांच्या नकला करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच त्यांनी ‘शक्तीमान’, ‘बिग बॉस’, ‘कॉमेडी का महा मुकाबला’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ इत्यादी टीव्ही मालिकांमध्ये काम केले.