Legendary Comedian Raju Srivastava Died at 58 : सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची बातमी ऐकताच संपूर्ण मनोरंजन विश्वालाच मोठा धक्का बसला. कलाक्षेत्रातील दिग्गज कलाकार मंडळींनी राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर उद्या दिल्लीमध्येच अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यापूर्वी त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये गेले ४० दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. राजू श्रीवास्तव यांचा पुतण्या कुशलने ईटाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना बुधवारी सकाळी दुसऱ्यांदा कार्डिअॅक अरेस्ट आला. यादरम्यानच राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत माळवली. एम्स रुग्णालयामधून त्यांना बाहेर आणतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.
विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयामधून बाहेर आणतानाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यांचा हा फोटो पाहून चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे हळहळ व्यक्त केली आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ओम शांती, सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा कमेंट करत चाहत्यांनी आपल्या लाडक्या कलाकाराला श्रद्धांजली वाहिली.
तसेच अनेक बॉलिवूड कलाकरांनी ट्वीट करत राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सोनू सुद, राजपाल यादव, अजय देवगण, दिव्या दत्ता प्रसिद्ध गायक कैलाश खेर, कपिल शर्मा आदी कलाकारांनी ट्वीट करत राजू श्रीवास्तव यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.