Legendary Comedian Raju Srivastava Died at 58 : आपल्या खुसखुशीत विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी सकाळी निधन झाले आहे. ते ५८ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर १० ऑगस्टपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ त्यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु होती. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी देशभरातील आणि विदेशातील त्यांचे चाहते प्रार्थना करत होते. पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजू श्रीवास्तव हे १० ऑगस्टला व्यायामशाळेत ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक खाली पडले. यानंतर त्यांना प्रशिक्षकाने तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफी करण्यात आली होती. पण यानंतर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालवत गेली. यादरम्यान ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे वृत्त समोर आलं होतं. पण १८ ऑगस्टला दुपारच्या सुमारास त्यांच्या मेंदूनही काम करणे बंद केलं. त्यानंतर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. गेल्या महिन्याभरापासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी आज म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला.

नक्की वाचा >> विश्लेषण : रिक्षाचालक ते स्टँडअप कॉमेडियन, राजू श्रीवास्तवचा प्रवास जाणून घ्या

राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध विनोदी कलाकार होते. ते अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग राहिले आहेत. त्यांची गणना देशातील सर्वोत्कृष्ट हास्यकलाकारांमध्ये केली जाते. राजू श्रीवास्तव ‘बिग बॉस’, ‘शक्तिमान’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’चा हिस्साही राहिले आहेत. त्यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘आये आठवा खदानी रुपया’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘बॉम्बे टू गोवा’ यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले.

राजू यांना सर्वात मोठे यश मिळाले ते ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये, जिथे ते उपविजेते होते. ‘गजोधर भैया’ हे त्यांचे प्रचलित पात्र जे आजही अनेकांच्या लक्षात आहेत. याव्यक्तिरिक्त त्यांनी अमिताभ बच्चन, लालू प्रसाद यादव, राम देव बाबा यांच्या नकला करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच त्यांनी ‘शक्तीमान’, ‘बिग बॉस’, ‘कॉमेडी का महा मुकाबला’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ इत्यादी टीव्ही मालिकांमध्ये काम केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comedian raju srivastava passed away at 58 in aiims hospital nrp