छोटय़ा पडद्यावरील सध्याच्या घडीचा सर्वात यशस्वी कार्यक्रम ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ येत्या सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. विशेष म्हणजे याबाबत या कार्यक्रमाचा होस्ट कपिल शर्मा याने स्वत: ‘ट्विपण्णी’ केली आहे.
दादी, बुवा, पलक, रामू आणि स्वत: बिट्टूच्या भूमिकेत कपिल शर्मा या सर्वच पात्रांच्या झक्कास टायमिंगने या कार्यक्रमाला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. पत्रकार रजत शर्मापासून क्रिकेटपटू सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग यांच्यापर्यंत तर अगदी नवख्या अध्ययन सुमनपासून ते दिग्गज अमिताभ बच्चन, बोमन इराणी, माधुरी दीक्षित, शाहरूख खान, सलमान खान यांच्यापर्यंत अनेकांनी या शोमध्ये हजेरी लावत प्रेक्षकांशी संवाद साधला. या वेगळ्या प्रकारच्या शोमुळे प्रेक्षकांनीही या कार्यक्रमाला पसंतीची पावती दिली.
मात्र आता हा शो सप्टेंबपर्यंतच चालवणार असल्याचे शोचा निर्माता आणि कॉमेडियन कपिल शर्मा याने सांगितले. मात्र आपण नवीन पात्रे आणि नव्या स्वरूपात लोकांचे मनोरंजन करण्यासाठी परत येणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सप्टेंबरनंतर कपिल कधी आणि कोणत्या स्वरूपात लोकांसमोर येणार, याची चर्चा सध्या मनोरंजन क्षेत्रात सुरू आहे.

Story img Loader