‘कलर्स’ वाहिनीवरील तुफान लोकप्रिय ठरलेला ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या कार्यक्रमाचा सूत्रधार-संचालक कपिल शर्मा कार्यक्रम सोडून जाणार, हा कार्यक्रम बंद पडणार वगैरे अफवांना गेल्या काही दिवसांपासून पीक आले होते. मात्र, खुद्द कपिल शर्मानेच या चर्चा-अफवांना पूर्णविराम दिला आहे. याच कार्यक्रमामुळे मला ओळख मिळाली आहे, त्यामुळे काहीही झाले तरी हा कार्यक्रम बंद केला जाणार नसल्याचे कपिलने स्पष्ट केले आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या आठव्या पर्वानिमित्त शनिवारी सुरत येथे आयोजित कार्यक्रमावेळी कपिलने ही माहिती दिली. कपिल या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाला आला होता.
‘कॉमेडी नाइट्स..’मुळे घराघरांत पोहोचलेला कपिल शर्मा लवकरच हा शो सोडून चित्रपटसृष्टीत जाणार अशी चर्चा होती. यशराज फिल्म्स या मोठय़ा बॅनरनेही कपिलला तीन चित्रपटांसाठी करारबद्ध केले होते. त्यातील पहिला चित्रपट ‘बँकचोर’च्या चित्रिकरणासाठी कपिलने तारखाही दिल्याचे बोलले जात होते. मात्र, कलर्स वाहिनीला चांगला चाललेला ‘कॉमेडी नाइट्स..’ बंद करायचा नव्हता. त्यामुळेच त्यांनी कपिलला अडचणी आणण्याचे प्रयत्न सुरू केले. या सगळ्या रस्सीखेचीत कपिलच्या हातून यशराज फिल्म्सचा करार निसटला. या पाश्र्वभूमीवर कपिलने ‘कॉमेडी नाइट्स..’ बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या तो अब्बास मस्तानचा आगामी चित्रपट करत असल्याचेही त्याने सांगितले. मध्यंतरी सप्टेंबर महिन्यामध्ये आणि चित्रपटांचे चित्रीकरण एकाचवेळी सांभाळता येणे शक्य नाही म्हणून हा शो संपवायचा विचार मी करत होतो, पण तेव्हा प्रेक्षकही रागावले म्हणून हा विचार मागे घेतल्याचे त्याने सांगितले. ‘हा शो आठवडय़ातून दोनदा दाखवला जातो, त्यामुळे मला संपूर्ण वेळ या शोला द्यावा लागतो. पण यापुढे जर कलर्स वाहिनीने मला आठवडय़ातून एकदा शो दाखवण्याची परवानगी दिली, तर मात्र मी या दोघांचा मेळ घालू शकेन,’ हेही त्याने नमूद केले.

२००-२५० चित्रपट करूनही लोकांना ओळख मिळत नाही. परंतु मला ‘कॉमेडी नाइट्स..’मुळे एक अभिनेता म्हणून ओळख मिळाली. एक कलाकार म्हणून चित्रपट करणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. असे असले तरी, यापुढे मी माझा शो आणि चित्रपट यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करेन.
कपिल शर्मा, अभिनेता

Story img Loader